Mumbai News : शनिवार, 20 जानेवारीपासून मुंबईतील उपनगरांना जोडणारा सायन रोड ओव्हर ब्रिज बंद होणार आहे. सायनचा हा महत्त्वाचा पूल पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतला आहे. बृहन्मुंबई पोलिस वाहतूक विभागाने जारी केलेल्या औपचारिक सूचनेनुसार, सायन पूल रेल्वेची पाचवी सहावी मार्गिका वाढण्यासाठी पाडण्यात येणार आहे. त्यामुळे 20 जानेवारी पासून वाहनांच्या वाहतुकीसाठी हा पूर्णपणे  बंद करण्यात येणार आहे. मात्र यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीवर परिणाम होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सायन ओव्हर ब्रिजवरून वाहनांची वाहतूक आता 20 जानेवारीपासून बंद होणार आहे. मुंबई वाहतूक पोलिसांनी बुधवारी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार सायन रोड ओव्हर ब्रिज बंद करण्याची मुदत आता बुधवारऐवजी 20 जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे. याआधी हा पूल बंद करण्याची शेवटची तारीख बुधवारी होती. त्यादृष्टीने आरओबीच्या दोन्ही टोकांना वाहतूक रोखण्यासाठी बॅरिकेडिंगचे काम सुरू झाले आहे. याशिवाय वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आजूबाजूच्या रस्त्यांवर ‘नो एंट्री’,‘नो पार्किंग’चे बोर्ड लावण्याच्या काम वेगात सुरु आहे.


मुंबई वाहतूक मुख्यालयाचे पोलीस उपायुक्त डॉ. राजू भुजबळ यांनी सांगितले की, बुधवारी सायन आरओबीवरील वाहतूक नव्याने बंद करण्याबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या अधिसूचनेद्वारे लोकांना वेळीच जागरूक केले जात आहे. पूल पाडण्याचे काम सुरू होताच वाहतुकीवर निर्बंध घालण्यात येणार आहेत. मात्र, बुधवारी सकाळपासून सर्व वाहने अन्य मार्गावर वळविण्याचे काम सुरू आहे. या पुलावर काही फूट अंतरावर 'कुठे वळवायचे' हे सांगणारे अनेक बोर्ड लावण्यात आले आहेत.


पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या सायन ओव्हर ब्रिजमध्ये तीन वाहतूक विभाग आहेत. त्यादृष्टीने माहीम, चुनाभट्टी, बीकेसी, चेंबूर, धारावी आदी वाहतूक पोलिसांच्या हद्दीत सुमारे 50 ते 60 वाहतूक वॉर्डन तैनात करून वाहतूक व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.


दरम्यान, सायन ओव्हर ब्रिजऐवजी, वाहनचालक हे त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी तीन मुख्य वळण मार्ग निवडू शकतात. यामध्ये कुर्ला दिशेतील इस्टर्न एक्स्प्रेस हायवेला जोडलेला सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड, सुलोचना शेट्टी मार्गाने सायन हॉस्पिटल रोड, जो धारावीतील कुंभारवाड्याला डॉ. बी.ए. रोड आणि चुनाभट्टी-वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स कनेक्टरला जोडतो. मात्र, या मार्गांवर दुचाकी आणि तीनचाकी वाहनांना परवानगी नाही. 


या मार्गांचा करा वापर


हा पूल बंद असल्याने सायनहून माहीमकडे जाताना सायन हॉस्पीटल जंक्शन येथून सुलोचना शेट्टी मार्गाने धारावी कुंभारवाडा जंक्शनवरुन डावे वळण घेऊन माटुंगा लेबर कॅम्प, कटारीयामार्गे जाता येईल किंवा धारावी कुंभारवाडा जंक्शनहून 60 फूट रोडने केमकर चौकातून डावे वळण घेऊनही एल एस रहेजा मार्गाचा वापर करता येईल. तसेच कुर्ला येथून चेंबूर लिंक रोडने पूर्व द्रूतगती मार्गाने पश्चिम उपगामध्ये जाता येणार आहे. चुनाभट्टी येथून बीकेसी ब्रिजद्वारे चारचाकीने बीकेसीमध्ये उतरता येईल. पण या ब्रिजवर बाईक आणि तीनचाकी वाहनांना परवानगी नसणार आहे.