देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई : मालाड (पूर्व) येथील (Malad) मालाड टेकडी जलाशयावरील ईनलेट व आऊटलेटवरील असणार्‍या झडपा बदलवण्याच्या कामासाठी सोमवार दिनांक 9 आणि शुक्रवार दिनांक 13 ऑक्टोबर रोजी ‘पी उत्तर’, ‘पी दक्षिण’ आणि ‘आर दक्षिण’ विभागातील काही परिसरात पाणीपुरवठा बंद (Water supply cut) राहणार आहे. या दोन दिवसांत तब्बल 16 तास पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे महापालिकेने (BMC) नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले आहे.
 
बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे मालाड (पूर्व) येथील मालाड टेकडी जलाशयावरील ईनलेट व आऊटलेटवरील असणार्‍या झडपा, जुन्या व खराब झाल्यामुळे एकूण 10 जलद्वार बदलण्‍याचे काम प्रस्‍तावित असून संपूर्ण काम दोन टप्‍प्‍यात पूर्ण करण्‍यात येईल. त्यापैकी पहिल्‍या टप्‍प्‍यातील कामे जसे की, 900 मिली मीटर व्यासाचे तीन व 750 मिली मीटर व्यासाचा 1 असे एकूण 4 जलद्वारे (वॉल्‍व) सोमवार, दिनांक 9 ऑक्टोबर 2023 रोजी बदलण्‍यात येणार आहेत. दुसऱ्या टप्‍प्‍यातील कामे जसे की, 900 मिली मीटर व्यासाचे 2 व 750 मिली मीटर व्यासाचा 1 असे एकूण 3 जलद्वार शुक्रवार, दिनांक 13 ऑक्टोबर 2023 रोजी बदलण्‍यात येतील.    


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यामुळे या कालावधीत सोमवार, दिनांक 9 ऑक्टोबर 2023 रोजी व शुक्रवार, दिनांक 13 ऑक्टोबर 2023  रोजी सकाळी 8 वाजेपासून मध्यरात्री 12 वाजेपर्यंत (16 तास) ‘पी उत्तर’ विभागातील मालाड (पूर्व), ‘पी दक्षिण’ विभागातील गोरेगाव (पूर्व) आणि ‘आर दक्षिण’ विभागातील काही परिसरांमध्ये संपूर्ण पाणीपुरवठा बंद राहील.  


‘पी उत्तर’, ‘पी दक्षिण’ आणि ‘आर दक्षिण’ विभागातील पाणीपुरवठा खंडित होणाऱ्या परिसरांचा सविस्तर तपशील पुढीलप्रमाणे 


1) ‘पी उत्तर’  – मालाड (पूर्व) परिसर - पाणीपुरवठा पूर्णपणे बंद.


2) ‘पी दक्षिण’  – गोरेगाव (पूर्व) परिसर - पाणीपुरवठा पूर्णपणे बंद.


3) ‘आर दक्षिण’ – कांदिवली (पूर्व) येथील बाणडोंगरी, झालावाड नगर, अशोकनगर (काही भाग), लोखंडवाला, हनुमान नगर, वडारपाडा - 1 व 2, नर्सीपाडा  परिसर - पाणीपुरवठा पूर्णपणे बंद.


दरम्यान, संबंधित परिसरातील नागरिकांनी उपरोक्त नमूद कालावधीत पाणी कपातीपूर्वी अगोदरच्या दिवशी पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. तसेच, कपातीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे, अशी विनंती बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे.