मुंबईकरांनो सावधान, मृत रोगट चिकनची चायनिज गाड्यांना होतेयं विक्री
सावधान, चायनीज फूडसाठी वापरतायत, मृत, रोगट चिकन
कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई : एक धक्कादायक बातमी नॉन व्हेज खाणा-यांसाठी ....मुंबईत मेलेल्या रोगट कोंबड्यांच्या चिकनची विक्री होतेय... एफडीए आणि महापालिकेनं शिवडीत धाड टाकून हा खळबळजनक प्रकार उघड केलाय. राज्यातली अशा प्रकारची ही पहिलीच कारवाई आहे. हे चिकन स्वस्त दरात चायनीजच्या गाड्यांना पुरवलं जायचं...
रोगट कोंबड्या
मुंबईच्या शिवडीमधल्या एका झोपडीत विनापरवाना कोंबड्या कापल्या जातायत आणि त्याही मेलेल्या. मुंबईबाहेरून रोज लाखो कोंबड्या मुंबईत आणताना अनेक रोगट कोंबड्यांचा मृत्यू होतो. या मेलेल्या कोंबड्या पूर्वी रे रोडला कच-याच्या ढिगा-यात टाकल्या जात, पण आता याच कोंबड्या थोडे पैसे देवून अशा झोपड्यांमध्ये आणून त्या कापल्या जातायत. त्यांचं चिकन स्वस्त दरात मुंबईतील चायनिज गाड्यांवर विकलं जातं. महापालिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनानं यावर धाड टाकली.
दोषींवर खटला
गेल्या अनेक महिन्यांपासून हा प्रकार इथं सुरू होता. दुपारनंतर चायनिज पदार्थांच्या गाड्यांवर हे स्वस्त दरात हे चिकन पाठवले जात होतं असं चिकन खाल्यामुळं विषबाधेसह इतरही आजार होवू शकतात अशी माहिती डॉक्टरांनी दिलीय. एफडीए दोषींवर न्यायालयात खटला दाखल करणार आहे.