मुंबई : मुंबई पोलिसांनी 803 मशिदींना भोंगे लावण्याची परवानगी दिली आहे. मुंबईत एकूण 1144 मशिदी आहेत. ज्यापैकी 803 मशिदींना भोंग्यासाठी परवानगी दिल्याची माहिती आहे. नियमांचे पालन करून भोंगे वाजवण्याची परवानगी पोलिसांकडून देण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज ठाकरे यांनी भोंग्याविरोधात भूमिका घेतल्यानंतर हा मु्द्दा संपूर्ण देशात चर्चेत आलाय. राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे काढण्यासाठी राज्य सरकारला 3 मेपर्यंतचा अल्टिमेटम दिला होता. त्यानंतर मशिदींसमोर हनुमान चालिसा लावणारच अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.


राज ठाकरे यांनी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर किती मशिदींवरील भोंगे हे अधिकृत आहेत. याबाबत ही चर्चा सुरु झाली होती. पण आता मुंबई पोलिसांनी 803 मशिदींना भोंग्याची परवानगी दिली आहे.


राज ठाकरे 1 मे च्या सभेत देखील भूमिका कायम ठेवली होती. पण या भूमिकेनंतर राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. दुसरीकडे मनसेच्या कार्यकर्त्यांना नोटीस दिल्या आहेत. त्यामुळे 4 मेच्या आधीच पोलीस अॅक्शनमोडमध्ये आहे. 


राज ठाकरे यांच्यावर पोलीस कारवाई करणार का? याकडे ही लक्ष लागून आहे. राज ठाकरे थोड्याच वेळेत पुढील भूमिका जाहीर करणार आहेत.


2015 साली राज्य सरकारने लाऊडस्पीकरबाबत जीआर जाहीर केला होता. रात्री 10 ते सकाळी 6 दरम्यान लाऊडस्पीकरचा वापर करण्यास मनाई असेल. ज्यामध्ये प्रेक्षकगृह, कॉन्फरन्स रूम, कम्युनिटी हॉल आणि बँक्वेट हॉल यांना वगळण्यात आलं होतं. कोणत्याही धार्मिक सणाच्या वेळी किंवा कोणत्याही महत्त्वाच्या कार्यक्रमात विशेषत: 10 ते 12 दरम्यान लाऊडस्पीकरला केवळ राज्य सरकार परवानगी देऊ शकते. मात्र तीही केवळ 15 दिवसांसाठी असेल. 


नियम 2000 च्या कलम 8 नुसार ध्वनी प्रदूषणाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची तरतूद आहे. ध्वनी प्रदूषणाचे उल्लंघन होत असल्यास 100 नंबर डायल करून त्याची तक्रार करता येईल. नाव न सांगताही तक्रार नोंदवता येणार असून त्यावर कारवाई देखील करण्यात येईल.