प्रशांत अंकुशराव,झी मीडिया,मुंबई : महागातला मोबाईल अगदी स्वस्तात अशी जाहिरात पाहिली की आपण ती पूर्ण वाचतो आणि तो मोबाईल घेण्याची तयारी करतो. मात्र अशा जाहिरातीला बळी पडून तुम्ही मोबाईल घेणार असाल तर सावध व्हा. फेसबुकवर (Facebook) अशा जाहिराती करुन लोकांची फसवणूक करण्यात येत असल्याचा प्रकार समोर आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

45 हजार चा फोन 4299 रुपयात मिळणार म्हटंल्यावर अनेक जण या जाहिरीत देणाऱ्यांना संपर्क करतात. फेसबुकवर या जाहिराती देण्यात येत होत्या. रेनो ए 11 प्रो हा फोन 45999 रुपयांना बाजारात मिळतो. मात्र हाच फोन 4 हजार 299 रुपयात मिळणार असल्याची जाहिरात फेसबुकवर देण्यात यायची. अनेक जण या फसव्या जाहिरातीला बळी पडल्याचे समोर आले आहे. 
फोन स्वस्तात मिळणार आणि तो हातात आल्यावरच पैसे द्यायचे असल्याने या जाहिरातीवर जास्त विश्वास ठेवण्यात येत होता. मात्र याद्वारेच ग्राहकांची फसवणूक करण्यात येत होती.


ग्राहकाने आपली माहिती फोन नंबर नोंदणी केल्यावर त्याने मागवलेला फोन कुरियरद्वारे घरी यायचा. पैसे दिल्यानंतरच फोन त्या व्यक्तीच्या ताब्यात देण्यात यायचा. मात्र फोनचा बॉक्स उघडताच तोच फोन डोक्यात मारण्याची पाळी ग्राहकावर यायची. कारण त्या  बॉक्सच्या आत बंद झालेले आणि भंगार मधील फोन पाठवले जायचे. अशा प्रकारे ग्राहकांची फसवणूक करण्यात येत होती.


पोलीस उप आयुक्त - गुन्हे संग्रामसिंह निशनदार यांनी दिलेल्या माहितीनुसार राहील इंटेक्ट या कंपनीच्या नावे लोकांची फसवणूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यामध्ये ग्राहकांना महागड्या फोनच्या बदल्यात जुने बंद असलेले फोन दिले जात होते. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) सापळा रचत मालाड येथून आरोपी राहील रांका आणि सिद्धेश सुतार या दोघांना अटक केली आहे. 
पोलिसांना यावेळी ३०० ग्राहकांनी असे फोन मागवल्याची माहिती मिळाली आहे. तसेच आरोपींकडून पोलिसांनी एक कोटी 37 लाख 52501 रुपयांचे एकूण 3199 जुने फोन जप्त केले आहेत. 


आरोपी महाराष्ट्राच्या बाहेर अशा फोनची विक्री करायचे. 8 ते 10 वर्षांपूर्वी बंद झालेले फोन भंगार मधून खरेदी करुन त्याला चांगली पॅकिंग करुन ते ग्राहकांना विकले जात असत. आरोपींनी यासाठी कॉल सेंटरही सुरु केले होते तसेच त्यांच्याकडे एकूण 20 कर्मचारी कामाला होते.


गेल्या चार वर्षापासून या आरोपींचा फसवणुकीचा धंदा सुरू होता. यावरून त्यांनी कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली असावी मात्र तक्रार न मिळाल्याने कारवाईस उशीर झाल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे मोबाईल खरेदी करताना योग्य ठिकाणाहून खरेदी करा असा सल्ला मुंबई पोलिसांनी दिला आहे