दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : मुंबईतल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीच्या वादानंतर मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. परमबीर सिंग यांना मातोश्रीवर मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी बोलावण्यात आलं होतं. मुख्यमंत्र्यांनी परमबीर सिंग यांना भेटायला बोलावणं हा गृहमंत्री अनिल देशमुख आणि राष्ट्रवादी काँग्रेसला शह असल्याचं बोललं जातंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ४ दिवसांमध्येच फिरवला. गृहखात्याने घेतलेला हा निर्णय मुख्यमंत्र्यांनी फिरलवल्यामुळे वाद निर्माण झाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतलेला हा निर्णय म्हणजे गृहमंत्री असलेल्या अनिल देशमुख यांना धक्का मानला जात आहे. मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांचा निर्णय रद्द केल्यामुळे सरकारमधील मतभेद आणि समन्वयाचा अभाव पुन्हा समोर आला आहे. 


दुसरीकडे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या वादावर खुलासा केला आहे. 'मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी ज्या अंतर्गत बदल्या केल्या, त्या माझ्या कार्यालयाने आणि मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाने रद्द केल्या आहेत. आमच्या सरकारमध्ये चांगला समन्वय आहे आणि कोणताही मतभेद नाही,' असं अनिल देशमुख म्हणाले आहेत.


गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जरी पोलिसांच्या बदल्या पोलीस आयुक्तांनी केल्याचं सांगत असले, तरी बदलीचे आदेश देणारं परिपत्रक गृहखात्याचं असल्यामुळे याबाबतचा गोंधळ आणखी वाढला आहे. 


पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा वाद, गृहमंत्र्यांच्या स्पष्टीकरणामुळे गोंधळ आणखी वाढला