Saif Ali Khan Stabbing Case: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणातील आरोपीचे फिंगरप्रिंट जुळत नसल्याच्या रिपोर्टवर मुंबई पोलिसांनी भाष्य केलं आहे. मुंबई पोलिसांनी हा रिपोर्ट फेटाळला असून, हे सत्य नसल्याचं स्पष्ट केलं आहे. कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांनी आरोपींच्या बोटांचे ठसे जुळत नसल्याचा रिपोर्ट चुकीचा असल्याचं सांगितलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई पोलिसांनी योग्य व्यक्तीला अटक केली आहे का? याबद्दल काही प्रसारमाध्यमांनी शंका उपस्थित केली आहे. एका वृत्तानुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपी शरीफुल इस्लाम (30) याचे बोटांचे ठसे अभिनेत्याच्या घरातून गोळा केलेल्या बोटांच्या ठशांशी जुळत नाही आहेत.


दरम्यान, झोन-9 चे पोलीस उपायुक्त दीक्षित गेडाम यांनी सांगितलं की, "फिंगरप्रिंट रिपोर्ट अजून येणं बाकी आहे". त्यांनी हा दावा फेटाळून लावला आहे. तथापि, सुरुवातीच्या रिपोर्टमध्ये बोटांचे ठसे जुळत असल्याचं सांगण्यात आलं होतं.


एका सीआयडी अधिकाऱ्याने सांगितलं आहे की, "मुंबई पोलिसांनकडून या प्रकरणाचा तपास केला जात असून त्यांच्याकडून अधिकृत माहिती घ्यायला हवी. मुंबई पोलिसांच्या फॉरेन्सिक लॅबला रिपोर्ट पाठवण्यात आला आहे".


सैफ अली खानवर चाकूहल्ला झाल्यानंतर वांद्रे पोलिसांनी अभिनेत्याच्या वांद्रे पश्चिम येथील 'सद्गरु शरण' या निवासस्थानावरून सुमारे 20 बोटांचे ठसे गोळा केले. ही घटना 16 जानेवारी रोजी घडली आणि 19 जानेवारी रोजी ठाण्यातून आरोपीला अटक करण्यात आली. अटकेनंतर पोलिसांनी शरीफुल इस्लामचे बोटांचे ठसे घेतले आणि दोन्ही बोटांचे ठसे तुलनात्मक तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवले. पोलिस बोटांच्या ठशांच्या अहवालाची आणि रक्त जुळणी अहवालाची वाट पाहत आहेत. पोलिसांनी अभिनेत्याच्या रक्ताच्या नमुन्यासह रक्ताने माखलेले कपडे देखील घेतले आहेत. तसंच आरोपीचे कपडे घेतले आहेत ज्यावर अभिनेत्याच्या रक्ताचे डाग आहे. हे दोन्ही फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आले.


दरम्यान, एका भारतीय नागरिकाच्या कागदपत्रांचा वापर करून शरीफुलने सिम कार्ड कसे मिळवले याचा तपास करण्यासाठी पोलिसांचे एक पथक कोलकाता येथे गेले आहे. आरोपीने शस्त्र कसे मिळवले याचाही पोलिस तपास करत आहेत आणि चेहऱ्याची ओळख चाचणी अद्याप प्रलंबित आहे. आरोपी 29 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत आहे.