Mumbai Attack : मुंबईवर पुन्हा 26/11प्रमाणे हल्ल्याचा मोठा कट?
Mumbai Terrorist Attack News : मुंबईला उडवण्याची पुन्हा धमकी दिली गेल्याने मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचं सावट आहे. 26/11 सारखा दहशतवादी हल्ला करण्याची धमकी दिली गेली आहे.
मुंबई : Mumbai Terrorist Attack News : मुंबईला उडवण्याची पुन्हा धमकी दिली गेल्याने मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचं सावट आहे. 26/11 सारखा दहशतवादी हल्ला करण्याची धमकी दिली गेली आहे. त्यामुळे संपूर्ण मुंबईची आणि देशाची झोप उडाली आहे. मुंबईला पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्याची धमकी आल्यानं पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. या धमकीचा तपास वेगाने सुरु आहे. तसेच मुबईतली महत्त्वाच्या भागांत सुरक्षा व्यवस्थाही वाढवण्यात आली आहे.
मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचं सावट
मुंबईवर दहशतवादी हल्ल्याची धमकी दिल्यानंतर सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. पोलीस कंट्रोल रूमला पाकिस्तानातून व्हॉट्सअप मेसेज आल्याची सूत्रांची माहिती आहे. हल्ल्यात भारतात असलेल्या 6 जणाची मदत घेणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचं सावट आहे.
मुंबईत 26/11 सारखा दहशतवादी हल्ला करण्याची धमकी या व्हॉट्सअॅप मेसेजमध्ये आहे. दोनच दिवसांपूर्वी रायगड जिल्ह्यात शस्त्रांनी भरलेली बोट सापडल्यानंतर आता मुंबईला दहशतवादी हल्ल्याची धमकी आल्याने काळजी वाढली आहे.
'ज्या नंबरवरुन धमकी, त्याच्याशी थेट संपर्क'
हा मेसेज ज्या नंबरवरुन आला त्या नंबरावर 'झी न्यूज'चे प्रतिनिधी अश्विनी कुमार पांडे यांनी संपर्क साधला. हा फोन नंबर लाहोरमधल्या मोहम्मद इम्तियाज नावाच्या व्यक्तीचा आहे. मात्र आपण कोणतीही धमकी दिलेली नाही, असे त्याचे म्हणणे आहे. आपल्या नंबरवरुन दुसरा कोणीतरी व्हॉट्सअॅप वापरत आहे, असा दावा त्याने केला आहे.
कोणाला आला हल्ल्याचा मेसेज
मुंबई वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला त्याच्या हेल्पलाइनच्या व्हॉट्सअॅप नंबरवर 26/11-प्रमाणे हल्ल्याची धमकी देणारे अनेक मेसेज प्राप्त झाले आहेत, असे एका अधिकाऱ्याने शनिवारी सांगितले. प्रथमदर्शनी, ज्या क्रमांकावरुन मेसेज पाठवले गेले आहेत तो देशाबाहेरचा आहे, असे ते म्हणाले.
शुक्रवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास मध्य मुंबईतील वरळी येथील नियंत्रण कक्षातून संचालित मुंबई पोलिसांच्या ट्रॅफिक हेल्पलाइनच्या व्हॉट्सअॅप नंबरवर मेसेज प्राप्त झाला, असे अधिकाऱ्याने सांगितले. या मेसेज मालिकेत, पाठवणार्याने 26/11 प्रकारच्या हल्ल्याची धमकी दिली आहे.
देशाच्या इतिहासातील सर्वात भयंकर दहशतवादी हल्ल्यांपैकी एक, 26 नोव्हेंबर 2008 रोजी पाकिस्तानमधील 10 सशस्त्र दहशतवाद्यांनी (Pakistan terrorists ) मुंबईत दहशतवादी हल्ला केल्यामुळे 166 लोक ठार आणि 300 हून अधिक जखमी झाले.