देवेंद्र कोल्हटकर, झी 24 तास, मुंबई: शहरात कायदा आणि सुवव्यस्था राखण्याचे काम पोलीस करत असतात. आंदोलन, मोर्चे, धार्मिक कार्यक्रम, राजकीय कार्यक्रम अशावेळी हजारोंच्या संख्येने लोकं रस्त्यावर उतरतात. अशावेळी पोलिसांवर प्रचंड ताण असतो. कमी मॅनपॉवर असताना त्यांना लाखोंच्या गर्दीवर नियंत्रण ठेवावे लागते.  गर्दीला नियंत्रणात ठेवण्याचे काम पोलीस करत असतात. त्यात आता पोलिसांच्या रिक्त पदांची माहिती समोर आली आहे. भविष्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून ही पदे तात्काळ भरणे गरजेचे आहे. आरटीआयमधून ही माहिती समोर आली असून यावर मुख्यमंत्री, गृहमंत्री काय निर्णय घेतात? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई शहराची कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलीसांची भूमिका महत्त्वाची आहे. आजमितीस अप्पर पोलीस आयुक्त पदापासून शिपाई पदापर्यंत 12 हजार 899पदे ​रिक्त असल्याचे उघड झाले आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी पोलिसांच्या रिक्त पदांची माहिती मागवली होती. त्याला अनुसरुन हे उत्तर देण्यात आले आहे. त्यातून ही माहिती समोर आली आहे. 
 
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी पोलिस आयुक्त कार्यालयाकडे अर्ज करत सद्यस्थितीत मंजूर पदे, कार्यरत पदे आणि रिक्त पदांची माहिती विचारली होती. मुंबई पोलीस आयुक्तलयांचे सहाय्यक पोलीस आयुक्त विनोद कांबळे यांनी अनिल गलगली यांस 30 नोव्हेंबर 2023 पर्यंतची माहिती दिली. यात एकूण मंजूर पदांची संख्या 51 हजार 308 आहेत. यात 38 हजार 409 कार्यरत पदे असून 12 हजार 899 पदे रिक्त आहेत.


सर्वाधिक रिक्त पदे पोलीस शिपायांची


पोलीस शिपाईची 28 हजार 938 पदे मंजूर आहेत. यापैकी 17 हजार 823 कार्यरत पदे असून 11 हजार 115 पदे रिक्त आहेत. यानंतर पोलीस उप निरीक्षकांची 3 हजार 543 पदे मंजूर असताना फक्त 2 हजार 318 कार्यरत पदे असून 1 हजार 224पदे रिक्त आहेत. 


पोलीस निरीक्षकची 1 हजार 90 मंजूर पदे असून यापैकी 313 पदे रिक्त असून सद्या 977 कार्यरत पदे आहेत. सहाय्यक पोलीस आयुक्तांची 141 पैकी 29 पदे रिक्त आहेत. पोलीस उपायुक्त यांची 43 पदे मंजूर असून 39 पदे कार्यरत आहेत. यात 4 पदे रिक्त आहेत. तर अप्पर पोलीस आयुक्त यांचे 12 पैकी फक्त 1 पदे रिक्त आहेत.


मंजूर पदे ही पूर्वीपासून असून यात काही बदल झाला नाही पण प्रत्येक वर्षी सेवानिवृत्ती मुळे रिक्त पदांच्या संख्येत वाढ होत चालली आहे, असे मत अनिल गलगली यांनी व्यक्त केले आहे. यात काळानुसार बदल करत रिक्त पदे भरताना मंजुर पदांची संख्या वाढविली तर मुंबई पोलिसांवर येत असलेला ताण कमी होईल, असे गलगली यांनी नमूद केले आहे.