`आम्हीही असाच विनाहेल्मेट प्रवास केला तर?,` स्कुटी चालवणाऱ्या महिला पोलिसांचा फोटो ट्वीट करत विचारणा, मुंबई पोलीस म्हणाले...
Mumbai Police: ट्विटरला (Twitter) एका व्यक्तीने हेल्मेट न घालता स्कुटी चालवणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा फोटो ट्वीट केल्यानंतर मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) त्यावर उत्तर दिलं आहे.
Mumbai Police: मुंबई पोलीस (Mumbai Police) वारंवार नागरिकांना वाहतुकीच्या नियमांचं पालन करण्याचं आवाहन करत असतात. शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी करत वाहतुकीचं उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर पोलीस कारवाई करत असतात. दरम्यान दुचाकी चालवताना पोलिसांनी मागे बसणाऱ्या प्रवाशालाही हेल्मेट बंधनकारक केल्यानंतर मुंबईकरांनी विरोध केला होता. मात्र नागरिकांकडून नियमांचं पालन करण्याची अपेक्षा असताना अनेकदा स्वत: पोलीस कर्मचारीच त्याचं उल्लंघन करताना दिसतात. अशा पोलिसांवरही कारवाई का होत नाही? असा प्रश्न सर्वसामान्य नेहमी विचारत असतात. नुकतंच असं एक प्रकरणही समोर आलं आहे.
रस्त्यावरुन प्रवास करताना अनेकदा काही पोलीस कर्मचारीही नियमांचं सर्रासपणे उल्लंघन करताना दिसत असतात. अशावेळी काही नागरिक त्यांना जाबही विचारतात. दरम्यान एका व्यक्तीने अशाच प्रकारे रस्त्यावरुन प्रवास करताना विनाहेल्मेट प्रवास करणाऱ्या दोन महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा फोटो काढत थेट मुंबई पोलिसांकडे तक्रार केली. महत्त्वाचं म्हणजे, मुंबई पोलिसांनीही या ट्विटला उत्तर दिलं आहे.
ट्विटला एका युजरने मुंबईत विनाहेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या दोन महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा फोटो ट्वीट केला आहे. या फोटोत दोन्ही महिला खाकी वर्दीत दिसत आहे. हे ट्वीट करत त्याने म्हटलं आहे की "आम्हीही अशाप्रकारे प्रवास केला तर? हे वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन नाही का?". या ट्वीटमध्ये त्याने मुंबई पोलिसांह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग केलं होतं.
फोटोमध्ये गाडीचा नंबर पाहता ती मुंबईतीलच असल्याचं स्पष्ट दिसत आहे. दरम्यान या ट्विटला मुंबई पोलिसांनीही उत्तर दिलं आहे. "आम्ही माटुंगा पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे याची माहिती दिली असून, योग्य ती कारवाई केली जाईल," असं उत्तर मुंबई पोलिसांनी या ट्विटवर दिलं आहे.
मुंबई पोलिसांनी या ट्विटची दखल घेतल्याने अनेकांनी त्यांचं कौतुक केलं आहे.