मुंबई : पोलिसांच्या (Mumbai Police) कामगिरीवरुन अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात. पण याच पोलिसांनी आतापर्यंत अनेकदा त्यांच्या चलाखीने आणि प्रसंगावधानामुळे आत्महत्या करणाऱ्यांना परावृत्त केलं आहे.  याचाच प्रत्यय आज (24 मे) पुन्हा एकदा मुंबईत आला. पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्येच्या विचाराने पूलाच्या कठड्यावर बसलेल्या महिलेला परावृत्त केले. मुंबईतील मानखूर्दमधून ही घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे ही महिला आमदाराची पत्नी असल्याचं तपासांती समोर आलं आहे. (Mumbai Police save mlas wife who tried to commit suicide from Mankhurd bridge) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नक्की काय घडलं? 


मानखुर्दमध्ये आज सकाळी सव्वा दहाच्या दरम्यान पोलिसांकडून नेहमीप्रमाणे वाहतूक सुरळित केली जात होती. यावेळेस मानखुर्दच्या पुलाच्या कठड्यावर एक महिला बसली असल्याची माहिती एका बाईकस्वाराने पोलिसांना दिली. सदर प्रकरणाची माहिती मिळताच उपस्थित कॉन्स्टेबल ढगे यांनी वेळ न दवडता त्या ठिकाणी धाव घेतली. यादरम्यान ढगे यांनी कंट्रोल रुम, मानखुर्द आणि नवी मुंबई पोलिसांनाही याबाबतची माहिती दिली. 


ढगे त्या ठिकाणी पोहचले. ती महिला फार निराश झालेली होती. ढगे यांनी ही बाब लक्षात घेतली. त्यांनी त्या महिलेला आत्महत्या करण्यापासून परावृत्त केलं. ढगेंच्या प्रयत्नांना यश आले. अखेर ती महिला कठड्यावरुन उतरण्यास राजी झाली. यानंतर त्या महिलेला चौकशीसाठी मानखुर्द पोलीस स्थानकात आणले गेले. चौकशीदरम्यान ती महिला आमदाराची पत्नी असल्याचं उघड झालं.     


कौटुंबिक वादामुळे उचललं कठोर पाऊल


पोलिसांनी या महिलेची चौकशी केली. चौकशी दरम्यान कौटुंबिक वादातून कठोर पाऊल उचलल्यांच त्या महिलेने सांगितलं. दरम्यान मानखुर्द पोलिसांनी अधिक तपासासाठी हे प्रकरण नवी मुंबई पोलिसांना सोपवलं आहे.