दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई: राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांना तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांमधील अस्वस्थता वाढली आहे. यापूर्वी १० ऑगस्ट, नंतर १५ ऑगस्ट अशी दोनदा मुदतवाढ देण्यात आली होती. यानंतर आज पुन्हा ५ सप्टेंबरपर्यंत तिसर्‍यांदा मुदतवाढ देण्यात आली.

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बदल्यांना मुदतवाढ देण्याचा सुधारित आदेश आज जारी करण्यात आला. गणेशोत्सव काळात पोलीसांवर कामाचा ताण असल्याने बदल्यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय झाल्याची चर्चा आहे. बदल्या होत नसल्याने पोलीस अधिकारी, आयपीएस अधिकारी अस्वस्थ झाले आहेत. बदल्या कधी होणार अशी चर्चाही पोलीस दलात रंगली आहे. 


काही दिवसांपूर्वी मुंबईतील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून महाविकासआघाडीत वाद निर्माण झाला होता. गृहमंत्रालयाकडून या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले होते. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या बदल्या तडकाफडकी रद्द केल्या होत्या. यानंतर शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. अखेर या चर्चेनंतर मुख्यमंत्र्यांकडून या बदल्यांना हिरवा कंदील दाखवण्यात आला होता.