मुंबईत पावसामुळे कुठे काय स्थिती?
मुंबईसह राज्यभरात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबईतील अनेक रस्त्यांवर पाणी साचले असून लोकस सेवा उशिराने सुरू आहे.
मुंबई : मुंबईसह राज्यभरात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबईतील अनेक रस्त्यांवर पाणी साचले असून लोकस सेवा उशिराने सुरू आहे.
तर दुसरीकडे येत्या २४ तासांत मुंबईसह, उत्तर आणि दक्षिण कोकणात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्यानं वर्तवला आहे.
मुंबईतल्या पावसामुळं हिंदमाता, दादर, परेल, कुर्ला परिसरात पाणी भरलं आहे. अद्यापही हे पाणी न ओसरल्याचं चित्र पाहायला मिळतंय. प्रचंड पावसामुळे मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक अर्धा तास उशिरानं सुरू असल्याची माहिती मिळतेय.
विरार पश्चिम स्टेशन रोड पूर्णपणे पाण्याखाली गेला असून रस्त्यावर गुडघाभर पाणी साचले आहे. नालासोपाऱ्यात रेल्वे ट्रॅकवर पाणी साचले आहे. तर इस्टर्न फ्री वे, वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील वाहतूक सुरळीत सुरू असल्याची माहिती आहे.
दुसरीकडे हाजी अली जंक्शन, पेडर रोड, वांद्रे-वरळी सी लिंकवरही वाहतूक सुरळीत आहे. मिलन सबवे सुरु पण पाणी साचल्याने पर्यायी मार्ग वापरण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.