दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : मुंबईमध्ये झालेल्या पावसानंतर आता ब्लेमगेमला सुरुवात झाली आहे. कालच्या पावसात एवढं पाणी का साठलं? यावरून आता एकमेकांवर खापर फोडण्याचा खेळ सुरू झाला आहे. हवामान विभागाने नीट अंदाज वर्तवला नाही, म्हणून मुंबईमध्ये पाणी साचल्याचं सरकारचं म्हणणं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'साधारणपणे १५० ते १७५ मिमी पाऊस पडेल, असा हवामान खात्याचा अंदाज होता. ३३० ते ३३५ मिमी पाऊस पडेल, हा अंदाज कोणाचाच नव्हता. हा अंदाज साफ चुकल्याचं मान्य करावं लागेल. हवामान खात्याचा अंदाज चुकल्यामुळे आमचेही अंदाज चुकले', असं आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत.


बुधवारच्या पावसात मुंबईची तुंबई कुणामुळे झाली यावरून खापर फोडायला सुरुवात झाली आहे. हवामान खात्याने २ दिवसात मुंबईत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला होता. अतिमुसळधार म्हणजे २०० मिमीपेक्षा जास्त पाऊस असतो. याबाबतची हवामान विभागाच्या वेबसाईटवरची माहितीही काल झी २४ तासने दाखवली होती. मात्र तरीही एवढा पाऊस येईल, असं कुणालाही वाटलं नव्हतं, त्यामुळे अभ्यास केला १०० मार्कांचा आणि पेपर आला ३०० मार्कांचा, म्हणून थोडीशी गडबड झाली, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.


आता चांगलीच गडबड झाली, हे पावसाने दाखवून दिलंच. यापुढे हवामान विभाग आणि सरकार यांच्यामध्ये आणखी समन्वय असेल तर पुढची गडबड नक्की टाळता येईल.