मुंबईत धुकं की प्रदूषण? हवामान विभागाकडून अलर्ट जारी; `या` भागातील नागरिकांना विशेष काळजी घेण्याची सूचना
मुंबईतील हवेची गुणवत्ता ढासळली आहे. बुधवारी शहरात दिल्लीपेक्षा वाईट स्थितीची नोंद झाली आहे. मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांक `मध्यम` श्रेणीत पोहोचला आहे.
मुंबईतील हवेची गुणवत्ता सलग दुसऱ्या दिवशीही ढासळली आहे. मुंबईतील हवेची गुणवत्ता इतकी खराब आहे की, सध्या दिल्लीपेक्षाही वाईट स्थिती आहे. सिस्टीम ऑफ एअर क्वालिटी अँड वेदर फोरकास्टिंग अँड रिसर्च (SAFAR) नुसार, मुंबईचा एकूण हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) दिल्लीच्या तुलनेत कमी आहे. दिल्लीचा हवा गुणवत्ता निर्देशांक 83 म्हणजेच समाधानकारक असताना या तुलनेत मुंबईत 119 म्हणजेच मध्यम आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसराजवळील हवेची गुणवत्ता सर्वाधिक ढासळली आहे. यानंतर तेथील नागरिकांसाठी आरोग्याची काळजी घेण्याची सूचना देण्यात आली आहे.
"प्रत्येकाला अस्वस्थता वाटू शकते. लोकांनी दीर्घकाळ बाहेर राहणं टाळलं पाहिजे कारण यामुळे श्वसनाचे आजार होऊ शकतात," असा इशारा देण्यात आला आहे. तसंच लोकांना सीएनजीच्या वापरावर भर देत वायू प्रदूषण कमी करण्यात मदत करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
मुंबईतील अनेक नागरिकांनी एक्सवर फोटो शेअर केले आहेत. यामध्ये शहर दाट धुक्याने वेढल्याप्रमाणे दिसत आहे. एका युजरन फोटो शेअर करत लिहिलं आहे की, 'दक्षिण मंबई धुक्याने वेढली आहे. सकाळी 9 वाजता 0 दृश्यमानता आहे'. तर दुसऱ्या एका युजरने ही दिल्ली नव्हे तर मुंबई आहे असं उपहासात्मकपणे म्हटलं आहे.
मंगळवारी अंधेरी, माझगाव आणि नवी मुंबईसह मुंबईतील अनेक भागांमध्ये हवा गुणवत्ता निर्देशांक 'वाईट' श्रेणीमध्ये नोंदवण्यात आला.
काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, पश्चिम घाटातून वाहणाऱ्या थंड वाऱ्यामुळे धूलिकण प्रदूषण निर्माण झालं आहे. परिणामी, मुंबईच्या किनारपट्टीवर धूळ आणि धुरासह गरम हवा स्थिर राहिली असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
महिन्याच्या सुरुवातीला, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (CPCB) केलेल्या अभ्यासात टॉप 10 सर्वाधिक प्रदूषित शहरांची नावं समोर आली होती. यामध्ये दिल्ली हे भारतातील सर्वात प्रदूषित शहर असल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. एनसीआरमधील दिल्ली, फरिदाबाद, गाझियाबाद, नोएडा आणि मेरठ ही शहरं यादीत पहिल्या पाच स्थानांवर असून त्यानंतर बिहारमधील पाटणा आणि मुझफ्फरपूर यांचा क्रमांक आहे.
दरम्यान दिल्लीच्या हवेच्या गुणवत्तेत किंचित सुधारणा झाली आहे. सोमवारी दिल्लीची हवा 'मध्यम' श्रेणीत नोंदवली गेली. त्यात बुधवारी आणखी सुधारणा होऊन ती 'समाधानकारक' श्रेणीत आली.
AQI नुसार, 0 आणि 50 मधील हवेची गुणवत्ता ही "चांगली" मानली जाते. तर 51 आणि 100 'समाधानकारक', 101 आणि 200 'मध्यम', 201 आणि 300 'खराब', 301 आणि 400 'अतिशय खराब" मानली जाते. तसंच 401 आणि 450 किंवा त्याहून अधिक असल्यास ही फार गंभीर स्थिती आहे.