अटल सेतूच्या पुढील टप्प्याचं बांधकाम सुरु; पुणे- मुंबई प्रवासात अशी होईल वेळेची आणखी बचत
Mumbai to Pune Via Atal Setu : अटल सेतूवरून प्रवास करत एक चित्रपट संपण्याआधीच गाठा पुणे... प्रवासाचा वेळ इतका कमी होणार पाहून हैराणच व्हाल.
Mumbai to Pune Via Atal Setu : मुंबई ते पुणे हे अंतर मुंबई- पुणे एक्स्प्रेस वे अर्थात द्रुतगती मार्गामुळं मोठ्या फरकानं कमी झालं आहे. देशातील सर्वात मोठा सागरी सेतू अशी ओळख असणाऱ्या मुंबई ट्रान्स हार्बर लिंक अटल सेतू (MTHL) मुळं मुख्य मुंबई शहर आणि नवी मुंबईतील प्रवासाची वेळ कमी झाली आणि परिणामी शहरातून पुढं प्रवास करु पाहणाऱ्या, पुण्याच्या दिशेनं जाणाऱ्यांनाही याचा थेट फायदा होताना दिसत आहे. किंबहुना येत्या काळात पुण्यापर्यंतचा प्रवास आणखी कमी वेळात शक्य होणार असून त्यादृष्टीनं अटल सेतूच्या पुढच्या टप्प्यासाठीच्या बांधकामालाही मंजुरी मिळाली आहे.
हेसुद्धा वाचा : Mhada Lottery 2024 : तब्बल 15 टक्के सवलतीसह म्हाडाची 5194 घरं तयार; कुठे आहेत या इमारती?
2024 च्या सुरुवातीलाच अटल सेतूचं उद्धाटन झालं, ज्यानंतर या मार्गानं प्रवास करण्याला अनेकांनीच पसंती दिली. याच सागरी सेतूच्या चिर्ले येथील जोडणी पुलाच्या अर्थात अटल सेतूच्याच पुढील टप्प्याच्या बांधकामासाठी हिरवा कंदिल दाखवण्यात आला आहे. ज्यामुळं मुंबई- पुण्यातील अंतर आणखी कमी झालं आहे. उपलब्ध माहितीनुसार अटल सेतूच्या या जोडणी पुलाच्या बांधकामासाठी 10 अब्ज रुपयांचा खर्च होण्याची प्राथमिक आकडेवारी समोर आली आहे.
दरम्यान, चिर्ले - पुणे या जोडणी पुलाचं काम 30 महिन्यांमध्ये पूर्ण होणार असल्याचं प्रस्तावित असून, यामुळं मुंबई आणि पुणे असा दैनंदिन प्रवास करणाऱ्यांसोबतच या मार्गावर लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्यांना त्यामुळं मोठा फायदा होणार आहे.
इथं दक्षिण मुंबईतील शिवडी आणि वरळी उन्नत मार्गाच्या जोडणी पुलाचं काम एमएमआरडीएनं सुरु केलं आहे. या मार्गाचं काम 65 टक्के पूर्ण झालं असून, आता उर्वरित कामावर भर दिला जात आहे. सध्या या बांधकामाअंतर्गत येणाऱ्या भूखंडावर एल्फिन्स्टनमधील 19 इमारतींमधील रहिवाशांच्या पुनर्विकासाच्या धोरणावर अद्याप स्पष्टोक्ती झाली नसल्यामुळं हे काम अडलं आहे. 850 झोपड्या आणि 19 इमारती, त्यातील निवासी आणि अनिवासी रहिवाशांच्या पुनर्विकासावर सध्या एमएमआरडीए तोडगा शोधताना दिसत आहे. तेव्हा या समस्येवर काय तोडगा निघतो पाहणं महत्त्वाचं असेल.