Mumbai University Skill Development: व्यावसायाभिमूख आणि कौशल्याधारीत अभ्यासक्रम राबविणाऱ्या मुंबई विद्यापीठाच्या गरवारे व्यवसाय व प्रशिक्षण संस्थेत महाराष्ट्र शासन आणि मुंबई विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालय कौशल्य विकास केंद्राची (MKVK) स्थापना करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना कौशल्याधारीत प्रशिक्षण तसेच रोजगार क्षमता निर्मितीसाठी मुंबई विद्यापीठाने नुकताच जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्रासोबत सामंजस्य करार केला आहे. या शैक्षणिक सामंजस्य कराराअंतर्गत गरवारे व्यवसाय व प्रशिक्षण संस्था प्रशिक्षण संस्था म्हणून भूमिका पार पाडणार आहे.
 
विद्यार्थ्यांना कौशल्यांनी सुसज्ज करून आणि व्यावहारिक ज्ञान देऊन त्यांच्यातील उद्योजकता व रोजगारक्षमता वाढीसाठी महाराष्ट्र कौशल्य विकास केंद्राअतर्गत 14 अत्यावश्यक कौशल्यांचे प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्टये ठरविण्यात आली आहेत. गरवारे व्यवसाय व प्रशिक्षण संस्थेमार्फत राबविण्यात लॉजिस्टिक सप्लाय चेन मॅनेजमेंट, पेंट्स टेक्नोलॉजी, इंटेरिअर डिझाईन, ट्रॅव्हल्स अँड टूर्स मॅनेजमेंट आणि रिटेल मॅनॅजमेंट अशा विविध कौशल्याधारीत आणि रोजगारक्षम अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण या संस्थेमार्फत दिले जाणार आहे. त्याचबरोबर प्लेसमेंटसाठीही सहाय्य केले जाणार आहे. हे प्रशिक्षण विनामूल्य असणार आहे. 


500 तासांच्या अवधीच्या या कौशल्याधारीत प्रशिक्षणासाठी बारावी, पदवी आणि पदव्युत्तर उत्तीर्ण विद्यार्थी नोंदणी करू शकणार असून या महिन्यांपासून हे प्रशिक्षण सुरु केले जाणार असल्याचे गरवारे व्यवसाय व प्रशिक्षण संस्थेचे संचालक डॉ. केयुरकुमार नायक यांनी सांगितले. या कौशल्य प्रशिक्षणाबाबतची अधिक माहिती गरवारे व्यवसाय व शिक्षण आणि जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातून प्राप्त केली जाऊ शकणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
 
आज भारतासह जगाला कुशल मनुष्यबळाची गरज आहे. ही गरज लक्षात घेता अधिकाअधिक युवकांना कौशल्याधारित शिक्षणाची गरज आहे. ज्ञानार्जन करताना विद्यार्थ्यांमधील कौशल्यातील दरी भरून काढण्यासाठी आणि सर्वसमावेशक वृध्दीला चालना देण्यासाठी मुंबई विद्यापीठाने हे एक महत्वपूर्ण पाऊल टाकले असून महाराष्ट्राच्या वाढीसाठी आणि समृद्धीसाठी या कराराचे महत्व अधोरेखित होणार असल्याची माहिती मुंबई विद्यापीठ कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी दिली.