मुंबई विद्यापीठाचा परीक्षा विभाग `नवा प्रताप` करण्यास `सज्ज`
मुंबई विद्यापीठाचा परीक्षा विभागाने आणखी एक नवा विक्रम करण्याचे मनसुबे तयार केले असल्याचं दिसतंय.
मुंबई : मुंबई विद्यापीठाचा परीक्षा विभागाने आणखी एक नवा विक्रम करण्याचे मनसुबे तयार केले असल्याचं दिसतंय, यापूर्वी दिवाळीनंतर निकाल लावून परीक्षा विभागाने जगभर एक नवा विक्रमच प्रस्थापित केला आहे. तो असा विक्रम त्यांना आणखी हवा हवासा आहे की काय, म्हणूनच विद्यार्थ्यांकडून अशी कोणतीही ठोस मागणी नसताना, मुंबई विद्यापीठाने आपल्या ३० अभ्यासक्रमांच्या परीक्षा एक महिना पुढे ढकलल्या आहेत. विद्यापीठाकडून या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
पुढे ढकललेल्या परीक्षांमध्ये खालील अभ्यासक्रमांचा समावेश
१) या परीक्षांमध्ये प्रामुख्याने 'एलएलएम'च्या परीक्षांचा समावेश आहे.
२) सायन्स शाखेतील एमएससी फॉरेन्सिक सायन्स सेमिस्टर-१ची १६ एप्रिलपासून सुरू होणारी परीक्षाही लांबणीवर पडली आहे. ती आता ४ जूनपासून सुरू होईल.
३) कॉमर्स, मॅनेजमेंट, आर्ट्स शाखेच्या सर्वाधिक परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
४) बीकॉम (फायनान्शिअल मॅनेजमेंट, सेमिस्टर-५), बीकॉम (अकाऊंट्स अँड फायनान्स) या परीक्षांचा समावेश आहे.
५) आर्ट्स शाखेच्या टीवायबीए, एमएच्या परीक्षांसाठीही नवे वेळापत्रक जाहीर केले आहे.
या वर्षी विद्यापीठ घेईल का परीक्षा?
मुळात परीक्षा घेतल्यानंतर ४५ दिवसांच्या आत परीक्षा विभागाला निकाल लावणे आवश्यक असते, तरीही आता परीक्षा विभागाने विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळण्याचा चंग बांधला आहे. म्हणूनच की काय आता परीक्षा पुढे ढकलण्याचा हा नवा सपाटा सुरू केला आहे.
निकालही पडणार लांबणीवर
परीक्षा पुढे ढकलल्याने निकालही लांबणीवर पडणार आहेत. या अगोदरच्या सेमिस्टरचे निकाल आताच लागले आहेत. काही परीक्षांचे निकाल पुढील आठवड्यात लागतील. त्यामुळे विद्यार्थ्यांचे निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांना काही वेळ मिळावा. नव्या परीक्षांसाठीच्या तयारीला वेळ मिळावा, यासाठी परीक्षा पुढे ढकलल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले.