ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक शिरीष कणेकर यांचं निधन, वयाच्या 80 व्या वर्षी अखेरचा श्वास
ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आणि लेखक शिरीष कणेकर यांचं आज मुंबईत निधन झालं. वयाच्या ऐंशीव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरु होते.
Shirish Kanekar Passed Away : ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक शिरीष कणेकर (Shirish Kanekar) यांचं वयाच्या 80 व्या वर्षी निधन झालं. प्रकृती अत्यावस्थामुळे गेले काही दिवस त्यांच्यावर हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरु होते.. पण रुग्णालयातच आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ह्रदयविकाराच्या धक्क्याने त्यांचं निधन झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. मुंबई विद्यापिठातून वकीलीची पदवी घेतल्यावर ते इंडियन एक्स्प्रेस वृत्तसमूहात पत्रकार म्हणून नोकरीला लागले. पुढे त्यांनी साहित्याच्या क्षेत्रात
दीर्घकाळ मुशाफिरी केली. बॉलीवूड, आणि मराठी चित्रपट सृष्टीवरील त्याचं खुमासदार शैलीतील लेखन कायम रसिकांच्या स्मरणात राहील.
6 जून 1943 रोजी पुण्यात शिरीष कणेकर यांचा जन्म झाला. महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील पेण हे कणेकरांचे मूळ गाव. शिरीष कणेकर यांचे वडिल रेल्वे विभागात डॉक्टर होते. त्यामुळे कणेकर यांचं बालपन मुंबईतल्या भायखळा इथल्या रेल्वे रुग्णालयाच्या सरकारी निवासस्थानात केलं. लेखक, पत्रकार म्हणून त्यांनी आपली वेगळ ओळख निर्माण केली. मनोरंजन आणि क्रीडा पत्रकारीतेतही ते ख्यातनाम होते. शिरीष कणेकर यांचा माझी फिल्लमबाजी हा कार्यक्रम प्रचंड गाजला. क्रिकेट आणि चित्रपटसृष्टीतील गमती-जमती हे त्यांच्या कार्यक्रमाचं स्वरुप होतं.
याशिवाय कणेकर यांनी अनेक वृत्तपत्रात लिखाण केलं. इंडियन एक्स्प्रेस, फ्री प्रेस जनरल, सिंडिकेटेड प्रेस न्यूज यात कणेकरांनी काम केलं. याशिवाय अनेक मराठी वृत्तपत्र तसंच पाक्षिक चंदेरी, साप्ताहिक चित्रानंद, यात तांनी स्तंभलेखनही केलं.
प्रकाशित साहित्य :
क्रिकेट-वेध (१९७७) : क्रिकेटवर
गाये चला जा (१९७८) : हिंदी चित्रपट संगीतावर
यादोंकी बारात (१९८५) : हिंदी चित्रपट व्यावसायिकांची व्यक्तिचित्रे
पुन्हा यादोंकी बारात (१९९५) : हिंदी चित्रपट व्यावसायिकांची आणखी व्यक्तिचित्रे
ते साठ दिवस (१९९७) : प्रवासवर्णन
डॉलरच्या देशा (२००२) : प्रवासवर्णन
रहस्यवल्ली (१९८६) : रहस्यकथा
रंगमंचीय कारकीर्द
रंगमचावर पदार्पण : ७ नोव्हेंबर १९८७, स्थळ : दीनानाथ नाट्यगृह, मुंबई.
भारतीय रंगमंचावर ‘स्टॅन्ड अप कॉमेडी’ प्रथम आणली.
‘माझी फिल्लमबाजी’, ‘फटकेबाजी’ व ‘कणेकरी’ या तीन एकपात्री कार्यक्रमांचे लेखन, दिग्दर्शन, निर्मिती व सादरीकरण केले.
पुरस्कार
मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे दिला जाणारा 'कै.विद्याधार गोखले ललित साहित्य पुरस्कार'
नाशिक नगरपालिका वाचानालयातर्फे 'सुरपारंब्या' या संग्रहास सर्वोत्कृष्ट विनोदी वाड्मयाचा पुरस्कार.
'लगाव बत्ती' या संग्रहास महाराष्ट्र साहित्य परिषदेचा उत्कृष्ट विनोदी वाड्मयाचा चि.वि.जोशी पुरस्कार.