लसीकरणाच्या बहाण्यानं घुसून घरावर हात साफ केले...पण एका टॅटूनं अडचणीत आणलं
लसीकरणाच्या बहाण्यानं घुसून घरावर हात साफ केले.
प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई : लसीकरणाच्या बहाण्याने घरात शिरून धारदार शस्त्राच्या धाकाने 4.5 लाखाची लूट करणाऱ्या महिलेला मुंबई पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. एका टॅटूने आरोपी पकडली गेली मात्र आरोपीचे नाव कळताच फिर्यादीही चक्रावून गेले.
वरळी नाका येथील गोपचार इमारतीत 74 वर्षीय महिला आपला नातू यांच्यासह घरी होत्या. त्याच वळी एक महिला तोंडाला मास्क लावून दरवाज्यावर आली आणि लसीकरणाची माहिती देते असे सांगत घरात शिरली . आत गेल्यावर पाणी द्या म्हणून त्या वृद्ध महिलेला सांगितले. त्या पाणी आणायला आत जाताच आरोपी महिलेने गळ्यावर धारदार शस्त्राचा धाक दाखवत नातवाचे आणि वृद्ध महिलेला बांधून ठेवले आणि सुमारे साडेचार लाख रुपयांचा ऐवज आणि पैसे घेऊन ती पसार झाली.
वरळी पोलिसांनी गुन्हा नोंदवत त्या महिलेचा शोध घेण्यास सुरुवात केली. सराईत गुन्हेगार तपासले. इमारतीच्या बाहेर असलेले सी सीसीटीव्ही तपासले मात्र त्या महिलेचा शोध लागत नव्हता. आजूबाजूच्या सीसीटीव्हीत ती दिसत नसल्याने पोलिसांनी त्याच इमारतीत लक्षकेंद्रित केले. पुन्हा आजीचा जवाब नोंदवला असता तिचा अंगावर टॅटू पाहिल्याचे सांगितले. या टॅटू असलेल्या दीपाली म्हात्रे या महिलेला त्याच सोसायटीच्या सी विंग मधून अटक केली आहे
आजू बाजूच्या सीसीटीव्हीत ती आरोपी दिसत नव्हती त्यामुळे सोसायटीत आरोपी असू शकतो असा संशय बळावला होता. तर एका अनोळखी महिलेने आपल्याकडे घराची चौकशी केल्याचे वृद्ध महिलेच्या सुनेने सांगितले, आरोपी ही टॅटू असलेली महिला असल्याचे कळल्याने शोध घेतला असता सी विंग मधील दीपाली म्हात्रे या महिलेला पोलिसांनी अटक केली. तोंडावर मास्क असला तरी टॅटूमुळे तिची ओळख पटली . ही आरोपी महिला याच इमारतीत राहायला होती आणि फिर्यादी यांची ती नातेवाईक आहे. आरोपीकडून चोरीला गेला सर्व मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे .
पैश्याची चणचण असल्याने हा गुन्हा केल्याचे आरोपीने कबुल केले आहे , शस्त्र आणि इतर साहित्य जप्त केले असून पुढील तपास सुरू आहे.