मुंबई :  मुंबईतल्या कोस्टल रोडमधला (Coastal Road Project) महत्त्वाचा टप्पा पार झालाय. गिरगाव चौपाटी ते प्रियदर्शनी पार्क (Girgon Chowpati to Priyadarshani Park) या दुसऱ्या बोगद्यां काम पूर्ण झालंय. भारतातील सर्वात मोठ्या 'मावळा' ह्या टिबीएम यंत्राच्या मदतीनं हे काम फत्ते झालंय. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मावळ्याच्या मदतीनं या बोगद्याच्या दुसऱ्या बाजूचं भगदाड पाडलं गेलं. मुख्यमंत्र्यांनी बोगद्यासमोर नारळ फोडून शुभेच्छा दिल्या. या प्रकल्पामुळे मुंबईकरांचा प्रवास आरोग्यदायी, आरामदायी आणि वाहतुक कोंडीमुक्त होईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी व्यक्त केला. तर या प्रकल्पामुळे मुंबईच्या पायाभूत सुविधांमध्ये एक महत्वपूर्ण अशी भर पडल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस (Devendra Fadanvis) यांनी सांगितलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महत्त्वाचा टप्पा पूर्ण
मुंबई कोस्टल रोड प्रकल्पातील स्वराज्यभूमी-गिरगावं चौपाटी ते प्रियदर्शनी पार्क दरम्यानचा बोगदा खणन्याचा अखेरचा टप्पा- ब्रेक थ्रू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कळ दाबून करण्यात आला. प्रियदर्शनी पार्क इथं टिबीएम यंत्राने खणनाचा हा अखेरचा टप्पा पूर्ण करून बोगदा पूर्ण करताच, याठिकाणी काम करणाऱ्या अभियंते, अधिकारी, कर्मचारी-कामगारांनी एकच जल्लोष केला. 
मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस या दोहोंनीही मुंबई महापालिका आणि प्रकल्प अंमलबजावणीची जबाबदारी असलेल्या कंपन्या, सल्लागार तसेच अभियंते, कर्मचारी-कामगारांचे अभिनंदन केलं. हे काम आव्हानात्मक होतं. ते पूर्ण झाल्याने आपण सर्व एका महत्वपूर्ण क्षणाचे साक्षीदार ठरल्याचे कौतुकोद्गारही काढले.


मुंबईसाठी महत्त्वाचा प्रकल्प
मुंबईसाठी हा अत्यंत महत्वाचा प्रकल्प असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटलंय. देशातील अशा प्रकारचा पहिलाच बोगदा पूर्ण केला आहे. हा प्रकल्प आणि त्यातील बोगदा पूर्ण करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरलं जात आहे. समुद्राखालून जाणाऱ्या रस्त्यांसाठी विविध सुविधाही अत्याधुनिक असतील. या प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी आपण स्थानिक कोळीवाड्यातील भुमिपुत्रांनाही विश्वासात घेतले आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. समुद्रातील दोन खांबामधील अंतरही त्यादृष्टीने 120 मीटर्सचे केलं आहे. सर्वांना सोबत घेऊन हा प्रकल्प पुढे नेला आहे. 


पर्यावरणीय अशा सर्व गोष्टींची काळजी घेतली आहे. मुंबईत असे महत्वाचे अनेक प्रकल्प सुरु आहेत. त्यांना केंद्राकडून विशेषतः आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवर्जून पाठबळ दिले आहे. मुंबई ही आंतरराष्ट्रीय नगरी आहे. आर्थिक राजधानी आहे. त्यामुळे मुंबईची वाहतूक कोंडीतून मुक्तता व्हावी, नागरिकांना दिलासा मिळेल, यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.


या किनारा रस्ता प्रकल्पाला छत्रपती संभाजीराजे यांचे नाव देण्याचे यापूर्वीच जाहीर केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. एमटीएचएल हा समुद्री सेतूही आता पूर्ण होतो आहे. हा मार्ग पुढे वरळीला जोडण्यात येणार आहे. त्यामुळे पश्चिम महामार्गावरील ताण कमी होणार आहे. मेट्रोचे विविध मार्ग, उड्डाणपूल यांचे काम पूर्ण होण्यामुळे पश्चिम उपनगरातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे. 


या प्रकल्पातीहा हा बोगदा खोदाईचा टप्पा पूर्ण होणे एक महत्वाचा टप्पा आहे असं उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलंय. या क्षणांचे साक्षीदार होण्याचे भाग्य आपल्याला लाभलं आहे. या प्रकल्पाचे काम मार्गी लागावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेष सहकार्य केलं असं फडणवीस यांनी म्हटलंय.


कोस्टल रोड प्रकल्पाची वैशिष्ट्य


-  भारतातील सर्वात मोठ्या व्यासाचा 12.19 मीटरचा हा बोगदा आहे 
- प्रकल्पातील बोगद्याला 375 मि.मी. जाड काँक्रिट अस्तर. त्यावर अग्निप्रतिबंधक उपाययोजने अंतर्गत फायरबोर्डची व्यवस्था. यामध्ये भारतात प्रथमच सकार्डो वायुविजन प्रणालीची व्यवस्था. 
- दुहेरी बोगद्यासाठी अद्ययावत वाहतूक व्‍यवस्‍थापन नियंत्रण प्रणालीची व्‍यवस्‍था. भारतामध्ये प्रथमच मोनोपाईल  बांधून पुलांची उभारणी. 
- प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते वांद्रे-वरळी सागरी सेतू वरळी टोकापर्यंतच्या या एकाच प्रकल्पामध्ये रस्ता, पूल, उन्नत मार्ग, उतरण मार्ग, आच्छादित बोगदा, समुद्र तसंच टेकडीखालून बोगदा, हरितक्षेत्राची निर्मिती. 
- पर्यावरणपूरक पद्धतीनं काम. प्रवाळ (Coral)स्थलांतर आणिअस्तित्व टिकविण्याची कार्यवाही यशस्वी. 
- या सागरी किनारी रस्त्यामुळे अंदाजे 70% वेळेची बचत, 34%  इंधन बचत. इंधन बचतीमुळे प्रती वर्षी विदेशी चलनाची मोठ्या प्रमाणात बचत. 
- ध्वनी प्रदूषण व वायू प्रदूषण कमी होण्यास मदत. अतिरिक्त जवळजवळ 70 हेक्टर हरितक्षेत्र निर्मितीमुळे प्रदूषण कमी होऊन पर्यायाने मुंबईकरांचे जीवनमान सुधारण्यास मदत. सुरक्षित, जलद, कमी खर्चात प्रवास 
- या प्रकल्पात हरितक्षेत्रात सायकल ट्रॅक (Cycle tracks), सार्वजनिक उद्याने, जॉगिंग ट्रॅक, (Jogging tracks), खुले प्रेक्षागृह (Open Theatre) इत्यादी समाविष्ट
- हाजीअली व महालक्ष्मी मंदीर या दोन्ही ठिकाणी वरळी इथं पार्किंगची सुविधा उपलब्ध 
- प्रकल्पाचा अंदाजित खर्च रु. 12 हजार 721/-कोटी (बांधकाम खर्च रु. 8429/- कोटी). 
- रस्त्याची लांबी - 10.58 कि.मी. मार्गिका संख्या - 8 (4+4), (बोगद्यांमध्ये 3+3)