मुंबई : खड्ड्यांची समस्या (Road Pothole) ही मुंबईकरांच्या पाचवीलाच पुजलेली आहे. निकृष्ट दर्जाचे काम आणि तेच तेच कंत्राटदार, अधिकारी वर्गाचे दुर्लक्ष यामुळे या समस्येतून सुटका होणं अशक्यच. यंदाही मुंबईकर या समस्येपासून वाचलेला नाही. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी पावसामुळे मुंबईकरांना खड्ड्यांचा सामना करावा लागत आहे. एकीकडे सामान्य माणूस हैराण झाला असताना दुसरीकडे राजकारणी मात्र आरोप-प्रत्यारोप करण्यात गुंतले आहेत.


आशिष शेलारांची टीका


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईतील ख़ड्ड्यांवरुन भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांच्यावर टीका केली आहे. कोरोनानंतर आज मुंबईकर खड्यांमुळे त्रस्त झाला आहे, मुंबई मनपा पोर्टलवर आकडेवारी एक  देतात आणि महापौर काही वेगळी माहिती देतात, थोडी तरी शरम करा अशी टीका आशिष शेलार यांनी महापौरांवर केली आहे. महापौरांची धावाधाव नाही तर पळताभूई झाली असल्याची टीकाही शेलार यांनी केली आहे. 


स्त्यावरील खड्ड्यांना (Road Pothole) जबाबदार कंत्राटदारांची गय करणार नाही, असा स्पष्ट इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी दिला आहे. यापुढे जबाबदार अधिकाऱ्यांवरही कारवाई करणार, अशी तंबीच मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिली आहे. यावरही शेलार यांनी टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांचा कारवाईचा इशारा केवळ धुळफेक आहे, वर्षभरात महापालिकने एकाही कंत्राटदारावर कारवाई केलेली नाही अशी टीका शेलार यांनी केली आहे. 


सेल्फी विथ खड्डे करणाऱ्या सुप्रिया सुळे कोठे गेल्या? असा टोलाही शेलार यांनी लगावला आहे. 


महापौर पेडणेकर यांचं उत्तर


आशिष शेलार यांनी केलेल्या टीकेला महापौर किशोरी पेडणेकर यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे. गेली 25 वर्ष भाजपा सोबत होते, त्यावेळेस खड्डे नव्हते का? तेव्हा तोंड का उघडलं नाही, आता असा कोणता माऊथवॉश घेतला की एवढी खळखळ करताय असा टोला महापौर यांनी लगावला आहे. आम्ही काम करतो, आरोपांचं खंडन करत बसत नाही, मुख्यमंत्र्यांवर टिका केली तरी ते कामातून उत्तर देतात असं महापौर यांनी म्हटलं आहे. महापौरांची पळता भुईथोडी म्हणताना शेलार यांनी मान्य केलं आहे की महापौर धावाधाव तरी करतायत, असं उत्तरही महापौर यांनी दिलं आहे.


करदाता मुंबईकर मात्र हैराण


रस्ते दुरुस्ती, पावसाळ्यात खड्डे भरण्यासाठी आधीच कोट्यवधी रुपयांची तरतूद केली असताना करदात्या मुंबईकरांच्या पैशाची पुन्हा उधळपट्टी का, असा सवाल सामान्य मुंबईकर विचारत आहे. मुंबईतील रस्ते दुरुस्तीसाठी कोट्यवधीच्या निधीची अर्थसंकल्पात तरतूद केली जाते. तरीही दर्जा आणि गुणवत्ता नेहमीच चर्चेत राहिलेले आहे. रस्ते आणि खड्ड्यांबाबत प्रशासनला फारसे गांभीर्य नसल्याने नेमेचि येतो मग पावसाळा अशीच काहीशी स्थिती खड्ड्यांची आहे.