मुंबई : लोकल प्रवासाबाबत मुंबईकरांसाठी एक मोठी बातमी आहे. मुंबई लोकलमधून प्रवास करण्यावर असलेले निर्बंध शिथिल होतील आणि लोकलची दारं खुली होतील असे संकेत मिळत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लसीचे 2 डोस घेतलेल्यांना लोकल प्रवासाची परवानगी द्या अन्यथा रेल रोको आंदोलन करून असा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिला होता. हातावर पोट असणारे शेकडो प्रवासी कर्जत आणि कसारा मार्गावरून प्रवास करतात. त्यामुळे 2 डोस घेतलेल्यांना ताबडतोब लोकल प्रवासाची परवानगी द्यावी असं प्रवीण दरेकर यांनी म्हंटलं होतं. 


याबाबत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी करणार तसंच रेल्वे मंत्र्यांकडे पाठपुरावा करेन असं आश्वासन प्रवीण दरेकर यांनी दिलं होतं. त्यानुसार दरेकर यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (raosaheb danve) आणि मंत्री विजय वेडट्टीवार यांना पत्र लिहून लोकल सुरु करण्याची मागणी केली. 


या पत्राची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दखल घेत प्रवीण दरेकर यांना फोन केला. या दोन्ही नेत्यांमध्ये लोकल सुरु करण्याबाबत चर्चा झाली. लोकल सुरू करण्यातबाबत सकारात्मक भूमिका घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती प्रवीण दरेकर यांनी दिली आहे. त्यामुळे लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना लवकरच लोकल प्रवासाची परवानगी मिळू शकते. 


मुंबई उपनगरीय लोकल रेल्वेतून सध्या केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच प्रवासाची मुभा आहे. इतर प्रवाशांना लोकलची दारे बंद करण्यात आली आहेत. यामुळे कर्जत-कसारा, पनवेल आणि वसई-विरार इथून दररोज कामानिमित्त मुंबईत येणाऱ्या प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतोय.