मुंबई : एकूण लोकसंख्येपैकी ३१ टक्के मुंबईकर तणावाखाली जीवन जगत असल्याचं एका संशोधनातून समोर आलं आहे. तसेच संपूर्ण देशातल्या महत्त्वाच्या शहरांमधील ६० टक्के नागरीक हे तणावाखाली जगत असल्याचही यात म्हटलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लीब्रेट या डॉक्टरांच्या ऑनलाईन सल्लागार संस्थेनं हा सर्व्हे केला आहे. यामध्ये दिल्ली (२७ टक्के), बंगळुरु (१४ टक्के), हैदराबाद (११ टक्के), चेन्नई (१० टक्के), कोलकत्ता (७ टक्के) इतकं प्रमाण आहे. हे सर्व लोक या सर्वेनुसार, अपूरा वेळ, दिलेलं काम वेळेत पूर्ण करु न शकणं, मानसिक तणावाशी संघर्ष, ऑफिसमधील राजकारण, ओव्हर टाईम काम करणं, तसेच, प्रोफेशनल जीवन आणि वैयक्तीक जीवनात योग्य संतुलन नसल्याची मुख्य कारणं आहेत.


लीब्रेट सीईओ आणि संस्थापक सौरभ अरोडा म्हणाले की, ‘लोकं तणावामुळे आपल्या परिवार आणि मित्रांसोबत निट वागत नाहीत. पण चांगलं आरोग्य ठेवण्यासाठी हे महत्वाच आहे की, त्यांनी त्यांतील निराशा आणि भावना व्यक्त कराव्यात’.


अरोडा म्हणाले की, ‘तुम्हाला हे माहिती असलं पाहिजे की, तुम्हाला कोणती गोष्ट परेशान करत आहे. तणावाचं कारण काय आहे. जेणेकरून त्यातून बाहेर पडता येईल. ब-याच काळापासून असलेल्या तणावपूर्ण भावना तुमचं आरोग्य बिघडवू शकतात’.


संशोधनानुसार, मीडिया आणि जनसंपर्क क्षेत्रातील २२ टक्के, बीपीओ १७ टक्के, ट्रॅव्हल्स अँड टूरिझम ९ टक्के, आणि जाहिरात तसेच इव्हेंट मॅनेजमेंट क्षेत्रातील ८ टक्के व्यक्ती तणावाखाली जीवन जगत आहेत. तर सेल्स आणि मार्केटिंग क्षेत्रातील सर्वाधिक २४ टक्के व्यक्ती तणावाखाली जगत असल्याचा दावा या संशोधनातून केला आहे.