मुंबईकरांची आजची अवस्था : पावसाने झोडपलं, रेल्वेने तुडवलं, रिक्षावाल्याने लुटलं
आज मुंबईकर पुन्हा एकदा त्रासलेला दिसत होता, आतल्या आत स्वत:वरच संतापलेला दिसत होता.
मुंबई : मुंबईकरांसाठी कोणता दिवस कसा असेल हे माहित नाही, मुंबईकरांना रोजच कामावर जाण्यासाठी किल्ल्यावर चढाई करण्यासारखाच असतो. यात सैनिकाप्रमाणे युद्धाची तयारी केल्यासारखं, पाण्याची बाटली, छत्री, आणि बॅगेत खाण्यासाठी थोडंस काहीतरी असं ठेवावंच लागतं. मुंबईकर माणसाला कुणाला चावायला, वेळ नसला, तरी विंचवासारखं प्रवासात हे बिढार, त्याला पाठीवरचं ठेवावं लागतं. मुंबईकरांसाठी आजचा दिवस तसाच होता.
आज मुंबईकर पुन्हा एकदा त्रासलेला दिसत होता, आतल्या आत स्वत:वरच संतापलेला दिसत होता. कामावर तर काही मुंबईकर पोहचू शकले नाहीत, पण घरी पोहोचणं देखील, त्यांच्यासाठी आज महागलं होतं.
मुंबईच्या माणसाला आज पावसाने सकाळी सकाळीच झोडपलं होतं, पावसात वाट काढत त्याने लोकल गाठली, पण रेल्वेनेही त्याला पायपीट करायला लावली, रेल्वे ट्रॅक तुडवत आज मुंबईकर कसा तरी पोहोचत होता. यानंतर संध्याकाळपर्यंतही वाहतूक सुरळीत न झाल्याने, रिक्षाने त्याला जवळची स्टेशन गाठावी लागली. यावेळी त्याच्याकडून १० पट भाडेआकारण्यात येत होता, साधारण जेथे १० रूपये लागत होते, तेथे ८० ते १०० रूपये आकारण्यात येत होते. तेव्हा मुंबईकरांसाठी आजची अवस्था पावसाने झोडपलं, रेल्वेने तुडवलं, रिक्षावाल्याने लुटलं....