मुंबईतील करीरोड रेल्वे स्थानक पुलावरुन वाद पेटलाय
मध्य रेल्वेच्या करीरोड स्थानकावर मध्यवर्ती ठिकाणी बांधण्यात येत असलेल्या पादचारी पुलाचं काम पूर्णत्वास आलंय. मात्र या पुलावरून सध्या वाद पेटलाय.
मुंबई : मध्य रेल्वेच्या करीरोड स्थानकावर मध्यवर्ती ठिकाणी बांधण्यात येत असलेल्या पादचारी पुलाचं काम पूर्णत्वास आलंय. मात्र या पुलावरून सध्या वाद पेटलाय. हा पूल करी रोड पश्चिमेला जिथे उतरतो तिथल्या स्थानिकांनी याला आक्षेप घेतलाय.
एल्फिन्स्टन स्थानक दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने पादचारी पुलांची कामं तातडीने पूर्ण करायला सुरूवात केलीय. करीरोड इथेही स्थानकाच्या मध्यभागी एका पुलाचे काम पूर्णात्वाकडे गेलेय. हा पूल पश्चिमेला महाराष्ट्र हायस्कूलच्या मैदानात उतरतो. त्याला स्थानिकांनी आक्षेप घेतलाय.
आधी हा पूल आधी दुसरीकडे उतरत होता. मात्र पादचारी पुलाशेजारी एक कंपनी आणि एका बांधकाम व्यावसायिकाच्या दबावामुळे पूल उतरण्याचा मार्ग बदलला असा स्थानिकांचा दावा आहे.
पादचारी पुलाच्या या वादात स्थानिक मनसे नेत्यांनी देखील उडी घेतली आहे. पादचारी पूल झालाच पाहिजे त्याला विरोध नाही. मात्र रहिवासी म्हणतातय त्याप्रमाणे पूल उतरण्याचा मार्ग का बदलला त्याचाही जाब विचारला पाहिजे असं मनसेने म्हटलेय.
एकीकडे करीरोड पश्चिमेला उतरणाऱ्या पुलाला स्थानिकांनी आक्षेप नोंदवला आहे तर दुसरीकडे करीरोड पूर्व बाजूस उतरणारा लष्कर बांधत असलेल्या पुलाला देखील महानगर पालिका आणि संबंधित यंत्रणांच्या समन्वयाचा फटका बसताना दिसतोय. त्यामुळे यातून तातडीने मार्ग निघणं गरजेचं आहे.