मुंबई :  बिहारमधील मुंगेरचा (Munger) हिंसाचार हा हिंदुत्वावरील हल्ला आहे. दुर्गापुजा सुरु असताना करण्यात आलेल्या हल्ल्याचा निषेध आहे. भाजपशासित राज्यांत घडणाऱ्या या घटनांकडे बेगडी हिंदुत्ववादी अत्यंत संयमाने, तटस्थपणे पाहतात. आता महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची मागणी करणारे गेले कुठे, असा रोखठोक सवाल शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी केला आहे. त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपण करतो तो चांगला कारभार, अशा पद्धतीचा कारभार सध्या भारतीय जनता पक्षाकडून सुरू आहे. बिहार, उत्तर प्रदेश, हरियाणा राज्यांत सध्या जे घडते आहे ते पाहता तेथे कायदा आणि सुव्यवस्थेचे राज्य आहे काय, असा प्रश्न विचारला जाऊ शकतो, पण ही राज्ये भाजपशासित असल्यामुळेच तेथे सर्व आलबेल आहे. गडबड फक्त महाराष्ट्र, पंजाब, पश्चिम बंगालात आणि राजस्थानातच आहे. त्या ठिकाणीच राष्ट्रपती राजवटीची मागणी केली जाऊ शकते, असे ते म्हणालेत.


मुंगेर हिंसाचारावर भाष्य करताना संजय राऊत म्हणाले, आतापर्यंत ना राज्यपालांनी, ना तेथील भाजपने यासंबंधी प्रश्न उपस्थित केले आहेत. मी तर महाराष्ट्राच्या राज्यपालांना तेथील राज्यपालांशी चर्चा करा, अशी विनंती करणार आहे. तेथील सरकारचे प्रमुख धर्मनिरपेक्ष झाले का असे विचारा, असे त्यांना सांगणार आहे. 


मुंगेरच्या हल्ल्यात एका तरुणाला मारले गेले. तरीही भाजप गप्प आहे. हेच यांचे हिदुत्व का, असा सवाल संजय राऊत यांनी यावेळी उपस्थित केला. मुंगेर जिल्ह्यात दुर्गा विसर्जनाच्या वेळी पोलिसांनी गोळीबार केला. मूर्ती खेचून विसर्जन करायला लावले. गोळीबारात एकजण ठार तर पंधरा लोक जखमी झाले. पोलिसांचे हे कृत्य जनरल डायरला लाजवणारे होते, असा आक्रोश सुरू आहे, राऊत म्हणाले.


दुर्गापूजेच्या विसर्जन यात्रेत हा सर्व गोंधळ झाला आणि पोलिसांनी सरळ बंदुका चालवल्या. अनुराग पोद्दार हा १८ वर्षांचा तरुण त्यात मारला गेला. दुर्गापूजा विसर्जनाबाबत हा गोंधळ, हिंसाचार आणि पोलिसी गोळीबार पश्चिम बंगाल, महाराष्ट्रासारख्या राज्यांत घडला असता तर एव्हाना ‘घंटा बजाव’छाप पोकळ हिंदुत्ववाद्यांनी नंगानाच घातला असता, असे टोला भाजपला संजय राऊत यांनी लगावला.