`राजीनाम्याचा आसुरी आनंद भाजपला घेऊ देणार नाही`, मविआ नवाब मलिक यांच्या पाठिशी ठाम
मविआतर्फे उद्या मुंबईत तर परवा संपूर्ण राज्यात केंद्र आणि भाजपाविरोधात आंदोलन करणार
मुंबई : अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना अटक केल्यानतंर मविआ नेत्यांची तातडीची बैठक वर्षा निवासस्थानी पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मविआचे महत्त्वाचे नेते उपस्थित होते. या बैठकीत नवाब मलिक यांच्या पाठिशी ठामपणे उभं राहण्याचा निर्णय घेण्यात आला. तसंच नवाब मलिक यांचा राजीनामाही घेण्याची गरज नसल्याचं ठरवण्यात आलं.
या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी पत्रकारांना बैठकीतली माहिती दिली. मोठीदुर्देवाची गोष्ट आहे की आज पहाटे आमचे सहकारी मंत्री नवाब मलिक यांच्या घरी ईडीचे अधिकारी, काही तपास केला आणि त्यानंतर काय चौकशी करुन त्यांना कोर्टात उभं केलं.
कोर्टात दोन्ही बाजूंनी युक्तीवाद झाला. १९९२ सालची घटना, १९९९ साली जागेचं काहीतरी अॅग्रीमेट झालं त्यानतंर बारा वर्षांनी PMLA जन्म, ज्या वेळी हा कायदा नव्हता. त्यावेळची घटना सांगत आहेत, असं छगन भुजबळ यांनी सांगितलं.
मलिक यांचं तोंड बंद करण्याचा प्रयत्न
या तीस वर्षात नवाब मलिक यांचं नावही कुठे नव्हतं, मलिक केंद्र सरकार आणि भाजपच्या संदर्भात बोलतात, अन्यायाचा उलगडा मलिक करतात, म्हणून त्यांचं तोंड बंद करण्याकसाठी हा सर्व प्रकार आहे. एफआयआर झाल्याशिवाय कारवाई होत नाही, म्हणून फेब्रुवारीमध्ये एफआयआर करण्यात आला. आणि त्याजोरावर मलिक यांना अटक करण्यात आली. मलिक यांच्या वकिलांनी सर्व आरोप फेटाळले आहेत.
सलिम पटेल म्हणून सांगतायत, सलीम फ्रुट हा आणखी एक कोणीतरी असं मलिक यांच्या वकिलांनी सांगितलं. हसीना पारकरही वारल्या. आता काहीतरी कारण काढून अटक करायची, तीनही पक्षांवर दबाव तयार करायचा, आम्ही निषेध करतो, लोकशाहीच्याविरोधातला हा कारभार आहे, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.
आता मुख्यमंत्री, शरद पवार यांच्याबरोबर बैठक झाली, आम्ही जनतेत जाऊ, उद्या १० वाजता मंत्रालयाच्या शेजारी महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ मुंबईत हजर असलेले सर्व मंत्री धरणं करणार आहोत. परवापासून पूर्ण राज्यात तीनही पक्षांचे कार्यकर्ते एकत्र येऊन तालुका, जिल्हा, शहर पातळीवर वेगवेगळ्या प्रकारे, मोर्चा, आंदोलन, धरणं आंदोलन करणार असल्याची माहिती छगन भुजबळ यांनी दिली.
नारायणे राणे यांचा राजीनामा घेतला का?
नवाब मलिक यांचा राजीनामा घेण्याचा प्रश्न उद्भवत नाही. गुन्हा सिद्ध झालेला नाही. नारायण राणेंनाही अटक झालेली होती, त्यांनी कुठे राजीनामी दिला. मलिक यांचा राजीनामा घेण्याचा प्रश्न येत नाही. एका विशिष्ट हेतून हे सर्व सुरु आहे. त्यांनी काहीही चूक केलेली नाही त्यामुळे मलिक यांना राजीनामा देण्याची गरज नाही, असं भुजबळ यांनी स्पष्ट केलं.
विरोधी पक्षांचा कार्यक्रम
आमच्या विरोधी पक्षाचा हा कार्यक्रम आहे, कोणत्या कोणत्या कारणाने मंत्र्यांचे राजीनामे मागायचे आणि आसुरी आनंद घ्यायचा, हे आम्ही होऊ देणार नाही मुद्दाहून एकेका मंत्र्याला टार्गेट करायचा हा कार्यक्रम विरोधकांचा आहे. अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला, पण हे जर जुनी प्रकरणं काढून राजीनामा मागणार असतील तर आता हे होऊ देणार नाही असंही भुजबळ यांनी स्पष्ट केलं.
शरद पवार यांना वेगवेगळ्या राज्यातून तसंच ममता बॅनर्जींचाही फोन आला, हा अन्याय आहे आता एकत्रित येऊन लढायला हवं असं सांगतिलं.