मुंबई : नालासोपारा स्फोटकांप्रकरणी सनातन संस्थेचे अध्यक्ष जयंत आठवले यांची चौकशी होण्याची शक्यता आहे.  एसटीएसच्या तपासात नाव समोर आलं तर आठवलेंची चौकशी  होणार असल्याचं महाराष्ट्र एसटीएसनं सांगितलंय. महाराष्ट्र एटीएस नालासोपारा स्फोटकांप्रकरणी वैभव राऊत, शरद कळसकर, सुधन्वा गोंधळेकर आणि श्रीकांत पांगरकर यांची चौकशी करत आहे. हे चौघे सध्या एटीएसच्या कोठडीत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वैभव राऊत साधक नसला तरी सनातनच्या व्यासपीठावर तो आला असल्याचं उघड झालंय. वैभव राऊत हिंदू गोवंश रक्षा समितीचा तर सुधन्वा श्री शिवप्रतिष्ठान हिंदूस्तानचा सदस्य आहे.  नरेंद्र दाभोलकर आणि गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी काही हिंदुत्ववादी संशयितांना अटक करण्यात आलीय.. यानिमित्तानं सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी पुन्हा जोर धरतेय.. यावरून वेगळंच राजकारण सुरू झालंय.



दाभोलकर हत्येप्रकरणी सचिन अंदुरे याला सीबीआयने अटक केल्यानंतर आता चौकशीचा वेग आलाय. औरंगाबादेत एटीएस आणि सीबीआयच्या पथकाकडून अनेक ठिकाणी चौकशी सुरु असल्याची माहिती मिळतेय. अंदुरे आणि शरद कळसकर यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे औरंगाबादच्या देवळाली परिसरातील मंजित प्राईड या इमारतीत एटीएसनं पहाटे छापा टाकला. या छाप्यात फ्लँट नं २०१४ मधून तीन संशयितांना चौकशीसाठी एटीएसनं ताब्यात घेतलंय. यातील एक सचिन अंदुरेचा नातेवाईक आहे, तर इतर दोन मित्र असल्याची सूत्रांची माहिती आहे.