तनुश्री दत्ताला माफी मागायला लावणार; नाना पाटेकरांनी उचलले `हे` पाऊल
चित्रपटाचे शुटिंग सुरु असताना माझ्यासोबत सेटवर ५०-१०० लोक उपस्थित होते.
मुंबई: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी पुन्हा एकदा त्यांच्यावर करण्यात आलेले लैंगिक शोषणाचे आरोप फेटाळून लावले आहेत. यासंदर्भात लवकरच अभिनेत्री तनुश्री दत्ताला कायदेशीर नोटीस पाठवली जाईल. अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने २००८ मध्ये चित्रपटाच्या सेटवर नाना पाटेकर यांनी आपले लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता.
नाना पाटेकर यांचे वकील राजेंद्र शिरोडकर यांनी म्हटले की, तनुश्री दत्ताने केलेले आरोप खोटे आहेत, ती धादांत खोटे बोलत आहे. याविरोधात तिला कायदेशीर नोटीस पाठविण्याची प्रक्रिया सध्या सुरु आहे. लवकरच तनुश्री दत्ताला ही नोटीस पाठवली जाईल. तिने आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागावी, एवढाच उल्लेख त्यामध्ये असेल.
तत्पूर्वी एका इंग्रजी वृत्तवाहिनीशी बोलतानाही नाना पाटेकर यांनीही आपल्यावरील आरोपांचे खंडन केले होते. तनुश्री दत्ता माझ्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करूच कसा शकते. चित्रपटाचे शुटिंग सुरु असताना माझ्यासोबत सेटवर ५०-१०० लोक उपस्थित होते. कोणीही उठते आणि तोंडाला येईल ते बोलते. पण, मी मात्र माझं काम करतच राहणार असल्याचे नाना पाटेकर यांनी स्पष्ट केले.