मुंबई : महाराष्ट्र विकासआघाडीच्या चर्चेत विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसला देण्याचा निर्णय झाला होता. मात्र, काँग्रेसने अचानक उपमुख्यमंत्री पदासाठी दावा केल्याने मोठा घोळ निर्माण झाला. मात्र, आज नाना पटोले यांचे नाव काँग्रेसकडून निश्चित करण्यात आले. त्यामुळे काँग्रेस - राष्ट्रवादीतील वाद मिटला आहे. तसेच नाना पटोले यांच्या नावावर पक्ष अध्यक्ष सोनिया गांधी यांनी शिक्कामोर्तब केले. त्यामुळे तेच आता विधानसभा अध्यक्ष असतील, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आणि मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्र विकासआघाडीच्या बैठकीत विधानसभा अध्यक्षपदावरूनच काँग्रेस आणि राष्ट्रवादीत वाद झाला होता. काँग्रेसकडून आक्रमकपणा घेण्यात आला होता. काँग्रेसला उपमुख्यमंत्री आणि अध्यक्षपद ही दोन्ही पदे हवी होती. पण वाटपात अध्यक्षपद किंवा उपमुख्यमंत्री यापैकी एकच पद मिळेल, असे स्पष्ट करण्यात आले होते. विधानसभा अध्यक्षपदाचा तिढा सुटल्याने आता उपमुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीच्या वाट्याला आले आहे. शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन झाले तरीही सत्तावाटपाचा गोंधळ सुरु होता, तो आता मिटला आहे. आघाडीच्या बुधवारी रात्री झालेल्या चर्चेत विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसला, तर उपमुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीला, असा निर्णय झाला होता. या बदल्यात राष्ट्रवादीला एक अतिरिक्त मंत्रिपद मिळणार होते.



दरम्यान, शपथविधीच्या दिवशी मात्र काँग्रेसने या निर्णयात बदल करण्याची मागणी केली. उपमुख्यमंत्रीपद काँग्रेसला तर विधानसभा अध्यक्षपद राष्ट्रवादीला देण्याचा प्रस्ताव काँग्रेसने सादर केला होता. मात्र, राष्ट्रवादीने ही मागणी फेटाळून लावली होती. तसेच शुक्रवारी पुन्हा काँग्रेसने नव्याने प्रयत्न सुरू केले. मात्र, यावर एकमत झाले नव्हते. कारण काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव विधानसभा अध्यक्षपदासाठी सूचविण्यात आले होते. मात्र, पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यासाठी उत्सुकता दाखवली नव्हती. त्यामुळे काँग्रेसकडून उपमुख्यमंत्री पदाची मागणी केली. या मागणीला राष्ट्रवादीने तीव्र विरोध केला.



काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. राष्ट्रवादीने विधानसभा अध्यक्षपद घ्यावे. या बदल्यात उपमुख्यमंत्रीपद काँग्रेसला मिळावे, अशी मागणी केली. आधी तिन्ही पक्षांच्या नेत्यांच्या बैठकीत झालेला निर्णय आता बदलणार कसा, असा सवाल राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी काँग्रेसला केला. काँग्रेसची बदल करण्याची मागणी मान्य करता येणार नाही, असेही अजित पवारांनी स्पष्ट केले होते.