नाणार: भाजप आमदाराची मुख्यमंत्र्यांवर टीका, उद्धव ठाकरेंच्या भूमिकेचे केले स्वागत
राज्याच्या मंत्र्याला व्यतिगत मत नसतं, ते सरकारचं मत असतं अशा शब्दात अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केलीय
नाणार: सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चेत असलेल्या नाणार भुसंपादन रद्द प्रकरणी युतीच्या संघर्षात अशोक चव्हाण आणि आशिष देशमुखऱ यांनी मुख्यमंत्र्यावर टीका केलीय. राज्याच्या मंत्र्याला व्यतिगत मत नसतं, ते सरकारचं मत असतं अशा शब्दात अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केलीय. तर भाजपचे बंडखोर आमदार आशिष देशमुख नाणार प्रकल्प विदर्भात नेण्याच्या उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेचं स्वागत केलय. 11 जिल्ह्यापैकी जी जागा त्यांना प्रकल्पाला योग्य वाटते तिथे प्रकल्प करावा असॆ म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेच्या वक्तव्याचे स्वागत केलं आहे.
उद्धव ठाकरेंनी दिलं मुख्यमंत्र्यांना आव्हान
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी सुभाष देसाईंनी काल केलेली अधिसूचना रद्द करण्याची घोषणा त्यांचं वैयक्तिक मत असल्याचं म्हटलं. शिवाय मंत्र्यांना अधिसूचना रद्द करण्याचा अधिकार नाही असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. त्यावर प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान दिलंय. नाणारचा प्रकल्प रद्द करण्यावरून सुरू झालेला शिवसेना-भाजपमधला संघर्ष आता श्रेयवादापर्यंत जाऊन पोहचलाय.
शिवसेना-भाजपमधला संघर्ष श्रेयवादापर्यंत
शिवसेनेचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी जमीन अधीग्रहणाची अधीसूचना रद्द करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचा दावा केला असला तरी मुख्यमंत्र्यांनीही जनहित लक्षात घेऊन निर्णय घेणार असल्याची भूमिका घेतलीय. मुळात आता नाणार रद्द करण्याशिवाय मुख्यमंत्र्यांसमोरही पर्याय नाही. मात्र रद्द करण्याचं संपूर्ण श्रेय शिवसेनेला जाऊ नये यासाठी मुख्यमंत्र्यांनी हा मुद्दा सध्यातरी ताणून धरलेला दिसतोय. नियम आणि कायदे लक्षाच घेऊनच निर्णय घेतल्याचं सुभाष देसाईचं म्हणणं आहे. तर शिवसेनेच्या मंत्र्यांनी प्रकल्प रद्द करण्यासंदर्भात पत्र दिलेलं असून त्यासंदर्भात कोकणाचं हित लक्षात घेऊनच निर्णय घेणार असल्याचं स्पष्ट केलंय.