नारायण राणे यांच्या अटकेची कारवाई संशयास्पद, प्रकरणाची सीबीआय चौकशी करा! भाजपची मागणी
महाविकास आघाडी सरकारविरोधात जनक्षोभ वाढत चालल्याने लक्ष विचलित करण्यासाठी हा आकांडतांडव सुरु असल्याची टीका
मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेचं प्रकरण संशयास्द आहे, या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी करा, अशी मागणी भाजपने केली आहे.
अटकेसाठी दबाव टाकणाऱ्या मंत्र्यासह IPS अधिकाऱ्यांची CBI चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन केली.
या संपूर्ण प्रकरणात अनिल परब (Anil Parab) हस्तक्षेप करत असल्याचा आरोप आशिष शेलार यांनी केला आहे. निवाडा होण्या आधीच अनिल परब यांनी निकाल जाहीर केला. अनिल परब यांची सोशल मीडियावर क्लीप व्हायरल झाली आहे. त्या पोलीस अधिकाऱ्यावर कशारितीने दबाव टाकला जात होता, हे दिसत होतं, कोर्टात सुनावणी झाली नसतानच त्यांच्याकडे माहिती कशी आली? यात मुंबई हायकोर्टाचाही उल्लेख होता, न्यायालयीन प्रक्रियेत फेरफार करण्यात आला आहे का? यावर शंका उपस्थित होते, त्यामुळे या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी आशिष शेलार यांनी केली आहे.
अनिल परब गृहखात्यात हस्तक्षेप करत असल्याबद्दल शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली होती. कालही हेच दिसून आलं. अनिल परब यांचा गृह खात्यामधला हस्तक्षेप गंभीर आह, असं शेलार यांनी म्हटलं आहे. शरद पवारांना कानशिलात लावलेली देशाने पाहिली, पण त्यावेळी शरद पवारांनी संयम पाळून त्या व्यक्तीला माफ केलं. पण संयमी माणसासोबत राहूनही शिवसेनेला ते कळत नाही, असा हल्लाबोल आशिष शेलार यांनी केला.
शिवसेनेकडून गलिच्छ राजकारण केलं जात आहे, अदखलपात्र गुन्ह्यात केंद्रीय मंत्र्याला अटक करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, पण एक गोष्ट लक्षात असू द्या सुरुवात तुम्ही केली, आता शेवट आम्ही करणार असा इशाराही आशिष शेलार यांनी दिला आहे.
15 ऑगस्टनंतर काही दुर्देवी घडामोडी घडल्या. सुभाष जाधव या शेतकऱ्याने सरकारच्या धोरणाला कंटाळून आत्महत्या केली. 22 ऑगस्टला त्यांचा मृत्यू झाला. इंदापूर तालुक्यातील शिवाजी चिमळकर यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. पालघरमधील काळू पवार यांनी 500 रुपयांचे कर्ज मुलाच्या अंत्यविधीसाठी घेतलं. हे कर्ज फेडलं नाही म्हणून सावकाराच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली. सरकारविरोधात जनक्षोभ वाढतोय. त्यापासून लक्ष विचलित करण्यासाठी शिवसेनेच्या लोकांनी महाराष्ट्रभर आंदोलन करतात असं त्यांनी सांगितलं.