सरकारमधील दोन नंबरच्या नेत्यामुळे माझा भाजप प्रवेश रखडला- राणे
नारायण राणे यांचे आत्मचरित्र प्रकाशनापूर्वीच गाजत आहे.
मुंबई: राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या आत्मचरित्राची सध्या राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा सुरु आहे. बेधडक स्वभावाच्या नारायण राणे यांनी या आत्मचरित्रात अनेक राजकीय गौप्यस्फोट केले आहेत. त्यामुळे प्रकाशनापूर्वीच हे आत्मचरित्र गाजत आहे. बुधवारी या आत्मचरित्रातील आणखी काही माहिती समोर आली. त्यानुसार राणेंनी आपल्या आत्मचरित्रात राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर तोफ डागल्याचे समजते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला भाजपमध्ये घेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, मला पक्षात घेतल्यास शिवसेनेने सरकारचा पाठिंबा काढण्याची धमकी दिली. याशिवाय, सरकारमधील दुसऱ्या क्रमांकाचे मंत्रीही अस्वस्थ झाले होते. भाजपमध्ये गेल्यावर माझ्याकडे महत्त्वाची खाती येतील, अशी भीती त्यांना सतावू लागली होती. त्यामुळेच माझा भाजप प्रवेश रखडला, असा आरोप राणेंनी केल्याचे समजते. मात्र, भाजपने हा दावा फेटाळून लावला आहे.
त्यामुळे आता याबाबतची अधिकृत खातरजमा ही आत्मचरित्राचे प्रकाशन झाल्यानंतरच होऊ शकते. मात्र, तोपर्यंत आणखी कुणाकुणाची पोलखोल होणार, याची उत्सुकता राजकीय वर्तुळाला लागली आहे. विशेष गोष्ट म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन होईल. त्यामुळे शिवसेना यावर काय भूमिका घेणार, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. उद्धव ठाकरे आणि मनोहर जोशी यांच्यामुळे मला शिवसेनेतून बाहेर पडावे लागले. राणेंना पक्षात ठेवलं तर मी रश्मी ठाकरे यांच्यासोबत घरातून निघून जाईल, अशी धमकी उद्धव यांनी बाळासाहेबांना दिल्याचे राणेंनी म्हटले आहे.
या पुस्तकात राणेंनी शिवसेनेसोबत काँग्रेसच्या नेत्यांवरही टीका केल्याचे समजते. काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी, त्यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर राणेंनी निशाणा साधला आहे.