दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई : मराठा मोर्चाच्या निमित्तानं नारायण राणे यांचं महत्व वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आला... आता त्यांचा भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरवण्याच्या हालचाली सुरू झाल्याहेत....


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नारायण राणेंच मन आता काँग्रेसमध्ये रमत नाहीये...ते आता फक्त तांत्रिकदृष्ट्या काँग्रेसमध्ये आहेत, मनाने ते कधीच भाजपमध्ये गेले आहेत...भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या अहमदाबादमधल्या दरबारात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या साक्षीनं राणेंच्या भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब झालं होतं... पण योग्य महूर्ताची प्रतीक्षा होती...तो क्षण जवळ आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सध्या जोरात सुरु आहे. 


राष्ट्रपती पदाची निवडणूक निर्विघ्न पार पडलीय...महाराष्ट्रात सरकारच्या स्थिरतेबाबत शिवसेनेनं जर काही गडबड करण्याचा प्रयत्न केलाच, तर अदृश्य हात मदतीला येतील याची खातरजमा मुख्यमंत्र्यानी त्या निवडणुकीत करून घेतलीय...त्यामुळे शिवसेनेच्या नाकावर टिचून राणेंचा भाजप प्रवेश होणार असल्याचं भाकीत वर्तवलं जातंय. त्यासाठी मराठा समाज आरक्षण समितीचे यापूर्वी अध्यक्ष राहिलेल्या नारायण राणे यांचे महत्व मूक क्रान्ती मोर्चाच्या काळात अचानक वाढविले गेले.


माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना महत्व मिळेल, अशी व्यवस्था करण्यात आली. राणे यांना मोर्चाचे श्रेय मिळावे यासाठी सुरू झालेल्या हालचालींची कल्पना आल्यानं शिवसेनेने त्यातुन अंग काढून घेतलं.


मुंबईतील मोर्चामध्ये नारायण राणे पुत्र नितेश आणि निलेश यांना मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावं लागलं, तरीही आयोजनात त्यांचा हिरीरीने सहभाग होता. राणेंची भाजप विरोधाची धार आता कमी झालीय. सभागृहात राणे शांत तरी असतात किंवा संधी मिळाल्यावर भाजपच्या मंत्रयांच्या मदतीला धावून जातात किंवा शिवसेनेची कोंडी करण्यावर धन्यता मानतात.


सिंधुदुर्गात राणेंनी उभारलेल्या हॉस्पिटल आणि  मेडिकल कॉलेजच्या पहिल्या भागाचं उदघाटन ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस  होणार असल्याचं सांगितलं जातेय....राष्ट्रीय स्तरावरच्या मोठ्या राजकीय नेत्याच्या हस्ते हे उद्घाटन करण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा जिल्ह्यात आहे.... त्यामुळे सुमारे 35 वर्षं शिवसेना, त्यानंतर एक तप काँग्रेसमध्ये काढलेल्या राणेंचं आता पक्षात काऊंट डाऊन सुरु झाल्याचे सांगितलं जातंय.....