मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यात काही ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकत्र येऊन प्रचार करणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंगळवारी रात्री भाजप नेत्यांसह मातोश्रीवर गेले होते. त्यावेळी उद्धव आणि फडणवीस यांच्यात बराच काळ चर्चा रंगल्याचे समजते. यावेळी पंतप्रधान मोदी व उद्धव ठाकरे यांच्या एकत्रित सभा कुठे घ्यायच्या यावर खल झाला. गेल्या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी भाजपरुपी अफजलखानाची फौज महाराष्ट्रावर चालून येत असल्याचे विधान केले होते. यानंतर दोन्ही पक्षांमधील तणाव शिगेला पोहोचला होता. मात्र, नुकत्याच झालेल्या युतीनंतर शिवसेना आणि भाजपने जुन्या गोष्टी विसरुन नवी सुरुवात करायचे ठरवले होते. त्यामुळे आता नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्रित प्रचाराला कसा प्रतिसाद मिळणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आदित्य ठाकरे निवडणूक लढणार नाहीत पण सत्तेवर अंकुश ठेवतील- संजय राऊत


युतीची घोषणा झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच मातोश्रीवर आले होते. यावेळी उद्धव आणि त्यांच्यात लोकसभा निवडणुकीच्या रणनीतीविषयी सविस्तर चर्चा झाली. शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांनी प्रचाराच्या सुरुवातीलाच युतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचे एकत्र मेळावे आयोजित केले आहेत. येत्या १५, १७ आणि १८ मार्च रोजी हे मेळावे  महाराष्ट्रात सहा वेगवेगळ्या जिल्ह्यांत होणार आहे. तसेच पदाधिकाऱ्यांच्या या मेळाव्यांनंतर महाराष्ट्रातील युतीचा सर्वात मोठा महामेळावा आयोजित केला जाणार आहे. त्याची घोषणाही लवकरच केली जाईल. या बैठकीला शिवसेनेकडून युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. तर भाजपकडून महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे नेतेदेखील उपस्थित होते. 


याशिवाय, ईशान्य मुंबईतून भाजप खासदार किरीट सोमय्या यांच्या उमेदवारीला असणारा शिवसैनिकांची विरोध, दानवे-खोतकर वाद या विषयांवरही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे समजते. येत्या २४ तारखेला कोल्हापूरात युतीची पहिली जाहीर सभा होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावरून प्रचाराचा नारळ फोडतील.