मोदींनी शरद पवारांना फोन केल्याचे वृत्त चुकीचे - राष्ट्रवादी
मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना फोनवरून शुभेच्छा दिल्याचे वृत्त चुकीचे.
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना फोनवरून शुभेच्छा दिल्याचे वृत्त चुकीचे असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी स्पष्ट केले आहे. भाजपकडून अशा अफवा पसरवल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच भाजप सरकार जर बहुमत सिद्ध करू शकले नाही तर पर्यायी सरकार बनवण्याचा विचार राष्ट्रवादी काँग्रेस करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, राज्यात नवं सरकार बनायचं तेव्हा बनेल असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलंय. तसंच सामनामध्ये आज छापून आलेला अग्रलेख डॅमेज कंट्रोल नसल्याची प्रतिक्रिया देखील त्यांनी दिली आहे.
सेना भाजपाच्या वादात आता राष्ट्रवादीने काडी केलीय. शिवसेनेसोबत जाण्याचा काँग्रेस राष्ट्रवादीचा तूर्तास विचार नाही मात्र पुढच्या घडामोडींनंतर आघाडीला भूमिका घ्यावी लागेल असं सांगत राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी युतीतील वादावर सूचक भाष्य केलं. विधीमंडळात भाजपाबाबत शिवसेना काय भूमिका घेते यावर आघाडीची भूमिका ठरेल असे मलिक म्हणाले.
तर दुसरीकडे भाजपपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचीही आज विधीमंडळ पक्षनेता निवडीसाठी बैठक होत आहे. राष्ट्रवादीला पहिल्यांदाच विरोधी पक्षनेतेपद मिळणार असल्यामुळे राष्ट्रवादीचा नेता कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांचं नाव चर्चेत आहे.