मुंबई: मराठी नववर्षाचा प्रारंभ करणारा गुढीपाडव्याचा सण आज राज्यभरात मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणाऱ्या गुढीपाडव्याच्या सणाला महाराष्ट्रात विशेष महत्त्व आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीत ट्विट करून महाराष्ट्रातील जनतेला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. गुढीपाडव्याच्या पवित्रदिनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या भेटीचा योग येतोय. महाराष्ट्राचे आशीर्वाद नेहमीच आम्हाला मोठे बळ देतात, असे मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. 



याशिवाय, अमिताभ बच्चन यांच्यासह बॉलिवूडच्या विविध सेलिब्रिटींनीही आपल्या चाहत्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. गुढीपाडव्याच्या मंगलदिनी मुंबईसह राज्यातील इतर प्रमुख शहरांमध्ये पारंपारिक शोभायात्रांचे आयोजनही करण्यात आले आहे. त्याचबरोबर सोशल मीडियातून गुढी पाडव्याच्या शुभेच्छांचे संदेश फॉरवर्ड होत आहेत. त्यामुळे सोशल मीडियावरही #GudiPadwa , नववर्ष हे हॅशटॅग टॉप ट्रेडिंगमध्ये आहेत.