नौदलांच्या जवानांची कमाल; अवघ्या हजार रुपयांत बनवली टेम्प्रेचर गन
बाजारपेठेत उपलब्ध असणाऱ्या टेम्प्रेचर गनच्या किंमती खूपच जास्त आहेत.
मुंबई: देशभरात कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे आरोग्य यंत्रणेसमोर अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. अनेक ठिकाणी मास्क, व्हेंटिलेटर्ससारख्या अनेक वैद्यकीय उपकरणांचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. रुग्णालयांबाहेर सार्वजनिक ठिकाणीही कोरोनाचा धोका टाळण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या उपकरणांची मागणी प्रचंड वाढली आहे.
सध्या अनेक ठिकाणी एखादी व्यक्ती कोरोनाबाधित आहे किंवा नाही, हे तपासण्यासाठी टेम्प्रेचर गनचा वापर होताना दिसत आहे. मात्र, बाजारपेठेत उपलब्ध असणाऱ्या टेम्प्रेचर गनच्या किंमती खूपच जास्त आहेत. त्यामध्ये कोरोनामुळे या किंमती आणखीनच वधारल्या आहेत.
कोरोनाचे संकट : मुंबईत कोरोनाग्रस्तांची संख्या अधिक वाढण्याची शक्यता
या सगळ्यावर मुंबई नेव्हल डॉकयार्डमधील जवानांनी एक उपाय शोधून काढला आहे. या जवानांनी त्यांच्याकडे असणारे साहित्य वापरून स्वदेशी बनावटीची टेम्प्रेचर गन तयार केली आहे. इन्फ्रारेड तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आलेल्या या गनच्या सहाय्याने लोकांचे स्क्रीनिंग करता येणे शक्य आहे. मुंबई नेव्हल डॉकयार्डमध्ये दररोज अनेक लोक ये-जा करतात. त्यांची तपासणी करताना प्रवेशद्वारावरील सुरक्षारक्षकांची चांगलीच दमछाक होते. मात्र, आता या स्वदेशी बनावटीच्या टेम्प्रेचर गनमुळे या सुरक्षारक्षकांवरील ताण बराच कमी होईल.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाजारपेठेत उपलब्ध असणाऱ्या उपकरणांच्या तुलनेत ही टेम्प्रेचर गन अतिश्य स्वस्त आहे. ही गन तयार करण्यासाठी १००० रुपयांपेक्षाही कमी खर्च आल्याची माहिती नेव्हल डॉकयार्डकडून देण्यात आली.