स्वाती नाईक, झी मीडिया, नवी मुंबई :  नवी मुंबईतल्या (Navi Mumbai) बोगस कर्मचारी घोटाळ्याचा झी (Bogus Employee Scam) २४ तासने पर्दाफाश केला आहे. सिडकोत (CIDCO) हा बोगस कर्मचारी घोटाळा बिनबोभाट सुरु होता. 2017 पासून म्हणजे गेली दोन वर्ष बोगस कर्मचाऱ्यांच्या नावाने पगार (Salary) काढला जात होता. कंत्राटी (Contract) पद्धतीवर नियुक्ती झालेली नसतानाही या कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 50 ते 60 हजार रुपये इतका तगडा पगार दिला जात होता. म्हणजेच या बोगस कर्मचाऱ्यांच्या नावाने 3 कोटी रुपये लाटण्यात आलेत. बोगस कर्मचाऱ्यांच्या नावे पगार काढून अधिकाऱ्यांनी सिडकोलाच तीन कोटींचा गंडा घातलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झी 24 तासने अधिक खोलात जाऊन या घोटाळ्याची चौकशी केली. तेव्हा आणखी 15 ते 20 बोगस कर्मचारी सिडकोचा पगार लाटत असल्याची शक्यता व्यक्त केली जातेय. म्हणजे अजूनही या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता आहे. कार्मिक अधिकाऱ्यांवर संशयाचं धुकं आहे. या विभागातला एक अधिकारी सोमवारपासून कामावर येत नाहीए. तर हा अधिकारी सध्या फरार आहे.. सिडकोचा दक्षता विभाग आता या घोटाळ्याची चौकशी करत असून लवकरच गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे...


नेमका हा कर्मचारी घोटाळा कसा सुरु होता?
सिडकोच्या आस्थापनेवर कंत्राटी पध्दतीने देखील नियुक्ती झालेली नसताना 14 बोगस कर्मचाऱ्यांच्या नावाने पगार काढला जात होता..  समन्वयक आणि सल्लागार यांच्या नावे हा पगार काढला जात होता. प्रत्येक कर्मचाऱ्याला प्रत्येकी 50 ते 60 हजार रुपये पगार होता.. म्हणजेच सुमारे तीन कोटींचा हा घोटाळा अधिकाऱ्यांनी संगनमत करुन केला आहे. गेली पाच वर्ष जरी गृहीत धरली तरी हा घोटाळा कोट्यवधींच्या घरात जातोय. याप्रकरणात कार्मिक खात्याच्या अधिकाऱ्यावर संशयाची सुई असून तो सध्या फरार आहे..


बोगस कर्मचारी घोटाळा कसा उघडकीस आला?
चेतन बावत नावाच्या एका व्यक्तीला आयकर खात्याची नोटीस आली. सिडकोतून तुमच्या बँक खात्यात तगड्या रकमेचा पगार जमा होतोय. मात्र तुम्ही त्यावरचा इन्कम टॅक्स का भरला नाही अशी ही नोटीस होती. आपण सिडकोत काम करत नसूनही ही काय भानगड आहे याची चौकशी करण्यासाठी चेतन सिडको कार्यालयात गेला. अमित खेरालिया नावाच्या आणखी एका व्यक्तीसोबतही असाच प्रकार घडला. या प्रकरणाला वाचा फुटल्यावर लेखा आणि कार्मिक विभागाने कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर या नावाची कोणतीच व्यक्ती सिडकोच्या आस्थापनेवर नसल्याची बाब समोर आली.  त्यानंतर दक्षता विभागाने केलेल्या चौकशीत आतापर्यंत 14  बोगस कर्मचाऱ्यांची नावे उघड झाली आहेत.  सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी याप्रकरणी सखोल चौकशीचे आदेश दिलेत...