स्वाती नाईक, झी मीडिया, नवी मुंबई : माजी नगरसेवकाचे नाव टी - शर्टवर न छापल्याने 19 वर्षीय तरुणावर जीवघेणा हल्ला झाल्याचा प्रकार नवी मुंबईमध्ये (Navi Mumbai) घडलाय. नवी मुंबईच्या कोपरखैरणे (kopar khairane) सेक्टर 16 मध्ये हा सर्व प्रकार घडलाय. शुल्लक कारणावरुन या तरुणावर कोयत्याने हल्ला करण्यात आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी माजी नगसेवकासह चौघांविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवी मुंबईतील कोपरखैरणे सेक्टर 16 येथे भर रस्त्यात एका 19 वर्षीय मुलावर सहा जणांनी कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात तरुणाच्या मानेवर गंभीर जखमा झाल्यात. नवी मुंबई पोलिसांनी याप्रकरणी सहा जणांविरोधात 307 कलामाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून अन्य पाच जणांचा शोध सुरू आहे. 


जखमी असलेल्या तरुणाकडून दरवर्षी टी- शर्टची छपाई केली जाते आणि त्यावर माजी नगरसेवक सुनील किंद्रे यांचे नाव छापलेले असते. मात्र यावर्षी छापण्यात आलेल्या टी - शर्टवर सुनील किंद्रे यांचे नाव नव्हते. त्यामुळे संतापलेल्या सुनील किंद्रे आणि त्यांच्या पाच साथीदारांनी टीशर्ट छपाई करणाऱ्या तरुणाकडे जाब विचारला. यानंतर दोघांमध्ये जोरदार भांडण झाले आणि या वादाचे रुपांतर जीवघेण्या हल्ल्यामध्ये झाले. सुनील किंद्रे आणि त्याच्या साथीदाराने तरुणावर कोयत्याने हल्ला चढवला.


केवळ टी- शर्टवर नावं न छापल्याने जीवघेणा हल्ला झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हा सर्व प्रकार जवळच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. दरम्यान पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवत पुढील तपास सुरु केला आहे.


पोलिसांनी काय सांगितले?


"कौपरखेरणे पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये साहिल हनुमंत खरोशी या 19 वर्षाच्या मुलाने त्या ठिकाणच्या स्थानिक माजी नगरसेवक सुनील केंद्रे यांचे नाव छापले नाही म्हणून काही लोकांनी त्याच्या डोक्यावर मारहाण केली आहे. याप्रकरणी आम्ही भादवि 307  नुसार गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये सुनील केंद्रे, सागर केंद्रे यांच्यासह आणखी तीन ते चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई करत आहोत," अशी माहिती परिमंडळ एकचे उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली.