नवी मुंबई पोलिसांच्या तावडीमधून नायजेरियन ड्रग्ज तस्कर पळाला; धक्कादायक Video Viral
Navi Mumbai Crime : मुंबईसह आसपासच्या परिसरात ड्रग्ज तस्कर मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची तस्करी करत असल्याचे गेल्या काही दिवसांपासून समोर येत आहे. नवी मुंबईतही नायजेरियन नागरिकांकडून ड्रग्जची विक्री करण्यात येत आहे. अशातच नवी मुंबई पोलिसांच्या हातून एक नायजेरियन ड्रग्ज तस्कर पळून गेल्याचे समोर आलं आहे.
स्वाती नाईक, झी मीडिया, नवी मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात ड्रग्जचा (Drugs) मोठ्या प्रमाणात विळखा पडताना दिसत आहे. अशातच नवी मुंबई पोलिसांनी (Navi Mumbai Police) नायजेरियन नागरिक आणि ड्रग्स तस्करांविरोधात धडक कारवाई केली आहे. नवी मुंबई पोलिसांनी उलव्यामध्ये (ulwe) धडक मोहीम राबवली आहे. या कारवाईत उलव्यातून एकूण 15 नायजेरियन (Nigerien drug trafficker) नागरिकांना एन.आर.आय पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्या चौकशीनंतर 14 नायजेरियन नागरिकांचा व्हिजा संपला असल्याने त्यांना देश सोडण्याचे आदेश देण्यात आलेत. मात्र या कारवाईत एक नायजेरियन नागरिक पोलिसांच्या तावडीतून पळून जाण्यात यशस्वी झाला आहे.
नवी मुंबई पोलिसांच्या हातावर तुरी देऊन एक नायजेरियन तस्कर पसार झालाय. नवी मुंबईचे डझनभर पोलीस एका आरोपीला घेऊन चालले होते. पोलीस व्हॅनमध्ये बसवत असतानाच या नायजेरियन आरोपीने धूम ठोकली. पोलिसांनी त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला खरा मात्र एक पोलीस कर्मचारी तोंडघशी पडला. नवी मुंबईत बेकायदेशीर वास्तव्य आणि ड्रग्स विक्रीप्रकरणी पोलिसांनी 15 नायजेरियन नागरिकांना ताब्यात घेतलं होतं. यातल्या एका आरोपीकडे 84 लाख 85 हजार रुपयांचं कोकेन आणि एमडी ड्रग्स सापडलंय. मात्र पोलिसांच्या हातावर तुरी देत एक आरोपी पसार झाल्याने नवी मुंबई पोलिसांवर टीका होतेय. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अगदी असाच प्रकार पुण्यातही काही दिवसांपूर्वी घडला होता. ससून रुग्णालयातून ड्रग्जची तस्करी करणारा आरोपी ललित पाटीलही पोलिसांच्या तावडीतून असाच फरार झाला होता. आता नवी मुंबई पोलिसांच्या हातातूनही ड्रग्ज प्रकरणातला आरोपीच पसार झालाय. त्यामुळे आता पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच नवी मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाने सहा ठिकाणी छापे टाकून अवैधरित्या राहून अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या 5 नायजेरियन नागरिकांना ताब्यात घेतले होते. यावेळी पोलिसांनी दोन कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. वाशीतील जुहूगाव येथील दोन इमारतींवर, कोपरखैरणे येथील बोनकोडे येथील एका इमारतीवर, खारघरमधील सेक्टर 27 आणि सेक्टर 35 येथील प्रत्येकी एक इमारतीवर आणि तळोजा येथे छापे टाकण्यात आले होते. 600 हून अधिक पोलिस कर्मचारी छाप्यांचा भाग होते आणि कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत बोलावण्यासाठी अधिक कर्मचारी राखीव ठेवण्यात आले होते.