स्वाती नाईक, झी मीडिया, नवी मुंबई : माथाडीच्या साईटवरुन झालेल्या वादातून पाच हल्लेखोरांनी नेरुळ सेक्टर-20 मध्ये राहणाऱ्या गुंड चिराग महेश लोके (30) याची निर्घृणपणे हत्या केल्याची घटना मंगळवारी संध्याकाळी घडली. या हल्ल्यात लोके याची पत्नी प्रियंका लोके (28) या गंभीर जखमी झाली आहेत. प्रियंका यांच्यावर नेरुळ मधील डी.वाय.पाटील रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मृत चिराग लोके हा नेरुळ सेक्टर-20 मध्ये राहत होता. तसेच तो अरुण गवळी व शरद मोहोळ या टोळीसाठी काम करत होता. चिराग लोके याची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहुन नेरुळ पोलिसांनी त्याच्यावर काही दिवसांपूर्वी मोक्कांतर्गत कारवाई केली होती. मंगळवारी सायंकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास चिराग लोके व त्याची पत्नी हे दोघे त्यांच्या मुलाला शाळेतून घरी घेऊन जात असताना आरोपी अरविंद सोडा व त्याच्या साथीदारांनी त्याला अडवून लोखंडी रॉडने मारहाण करण्यास सुरुवात केली होती. यावेळी त्याची पत्नी प्रियंका त्याला वाचवण्यासाठी मध्ये गेली असता हल्लेखोरांनी तिच्यावर देखील लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला करुन पलायन केले.


या हल्ल्यात चिरागचा जागीच मृत्यू झाला. तर पत्नी प्रियंका गंभीर जखमी झाली असून तिच्यावर नेरुळ मधील डॉ.डी.वाय.पाटील रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. या घटनेनंतर नेरुळ पोलिसांनी आरोपी आरोपी अरविंद रामनाथ सोडा, अरबाज, पगला, शेरा व इतर दोन अशा एकूण पाच मारेकऱ्यांविरोधात हत्या, हत्येचा प्रयत्न व इतर कलमांखाली गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध सुरु केला आहे.  


दरम्यान, मृत चिराग महेश लोके आणि आरोपी आरोपी अरविंद रामनाथ सोडा हे एकाच तुरुंगामध्ये बंद होते. त्यामुळे त्यांची एकमेकांशी चांगलीच ओळख झाली होती. गेल्या काही महिन्यांपासून अरविंद सोडा आणि चिरागमध्ये मानखुर्द इथल्या एका माथाडी साईटवरुन वाद सुरु होता. याच वादातून 9 फेब्रुवारीला चिराग आणि त्याची पत्नी प्रियांकाला काही गुंडांनी धमकावले देखील होते. त्यानंतर आता याच वादातून चिरागची हत्या झाल्याचे म्हटलं जात आहे. त्यानुसार नेरुळ पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास करण्यात येत आहे.