नवी मुंबईत PM मोदींच्या सभास्थळी 500 खाटांचे तात्पुरते रुग्णालय; नेमकं प्रकरण काय?
PM Modi Navi Mumbai Visit : नवी मुंबईत पंतप्रधान मोदी यांच्या मुख्य उपस्थितीमध्ये शुक्रवारी होणाऱ्या सोहळ्यात सव्वा लाख महिला आणि मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जय्यत तयारी करण्यात येत आहे.
PM Modi Navi Mumbai Visit : एमएमआरडीएकडून बांधण्यात आलेला अटल सेतू म्हणजेच शिवडी-नाव्हाशेवा सागरी सेतू वाहतूक सेवेसाठी सज्ज झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या सागरी सेतूचे उद्घाटन करण्यात येणार आहे. यावेळी विविध सरकारी प्रकल्पांचा उद्घाटन सोहळा पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमात सव्वा लाख महिलांना पंतप्रधान मोदी संबोधित करणार आहेत. त्यामुळे पनवेल तालुक्यातील उलवे येथे हा भव्यदिव्य सोहळा होणार आहे. त्यामुळे आता आरोग्य विभागानेही मोठी तयारी केली आहे. पंतप्रधान मोदींच्या सभास्थळी 500 खाटांचे सुसज्ज रुग्णालय उभारण्यात येत आहे.
गेल्या वर्षी खारघर इथे झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यावेळी 14 जणांचा चेंगराचेंगरीमुळे मृत्यू झाला होता. सकाळी 11 वाजण्याच्या कडक उन्हात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यामुळे याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून रायगड जिल्हाधिकारी आमि आरोग्य विभागाने विशेष काळजी घेतली आहे. उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमाची वेळ संध्याकाळच्या सुमारास ठेवण्यात आली आहे. संध्याकाळी चार वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या ठिकाणी भव्य मंडपामध्ये हा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमात सव्वा लाख महिला आणि महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाकडून तब्बल 500 खाटांचे तात्पुरते रुग्णालय उभारण्यात येत आहे. या रुग्णालयात एक्सरे, रक्त तपासणी, सोनोग्राफी आणि कार्डिओग्राफी अशा सर्व सुविधा असणार आहेत. तसेच या रुग्णालयामध्ये 50 खाटांचा अतिदक्षता विभागदेखील असणार आहे. या एका कार्यक्रमासाठी साडेपाचशे डॉक्टर आणि आरोग्यसेवकांची नेमणूक करण्यात आली आहे. यासोबत चार मोठ्या गाड्या भरुन औषधांचा साठा देखील कार्यक्रमस्थळी असणार आहे. सव्वा लाख नागरिकांच्या चहा नाश्ता आणि पिण्याचे पाणी यासाठी सरकारी खर्चातून सोय करण्यात येणार आहे.
कार्यक्रमस्थळी 1200 वाहने उभी राहू शकतील असे पाच वाहनतळ उभारण्यात येत आहे. त्यातील प्रत्येक वाहनतळाशेजारी तीन रुग्णवाहिका देखील असणार आहे. या वाहनतळालगत 25 आरोग्यपथके देखील नेमण्यात आली आहे. या पथकांमध्ये औषधसाठ्यासोबत दोन डॉक्टर, दोन नर्स आणि एक चालक यांचा समावेश असणार आहे. तसेच अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी वेगळ्या रुग्णवाहिका ठेवण्यात आल्या आहेत. त्यातील 40 रुग्णवाहिकांपैकी 12 रुग्णवाहिका या कार्डिआक लाइफ सपोर्टच्या असणार आहेत. यासह अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पापासून जवळ असणाऱ्या मोठ्या रुग्णालयांमध्ये विशेष नियोजन करण्यात आलं आहे.