Navneet Rana Allegations : व्हिडिओनंतर आता मुंबई पोलिसांनी दिले आणखी पुरावे
मुंबई पोलिसांनी राज्य सरकारला अहवाल दिला असून पुरावेही सादर केला आहे
मुंबई : आपण मागासवर्गीय असल्यानेच आपल्याला पोलिसांनी वाईट वागणूक दिली असा गंभीर आरोप नवनीत राणा यांनी केला होता. पोलिसांनी आपल्याला पाणीही दिलं नाही तसंच वॉशरुम वापरू दिला नाही असंही नवनीत राणा यांचं म्हणणं होतं. या संबंधी नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांना एक पत्र लिहिलं असून त्यामध्ये हे गंभीर आरोप केले होते.
नवनीत राणा यांनी केलेल्या आरोपांना मुंबई पोलिसांनी एक व्हिडिओ रिलीज करत उत्तर दिलं होतं. पोलीस स्थानकात बसलेल्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) हे चहा पीत असल्याचा व्हिडिओ मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे (Mumbai Police Commissioner Sanjay Pandey) यांनी ट्विट केला. त्यांच्यासमोर पाण्याची बाटलीही असल्याचं या व्हिड़िओत दिसत होतं.
त्यानंतर आता मुंबई पोलिसांनी राज्य सरकारला एक अहवाल सादर केला आहे. नवनीत राणांना पोलीस स्टेशनमध्ये बिसलेरीचं पाणी दिलं होतं
तसंच अधिकाऱ्याचं वॉशरुमही वापरु दिलं होतं, असं या अहवालात नमुद करण्यात आलं आहे. नवनीत राणा यांना आधी लॉकअपमधील पाणी दिलं, मात्र ते घ्यायला त्यांनी नकार दिला. त्यानंतर पोलिसांनी मिनरल वॉटर दिल्याचं अहवालात म्हटलंय. राणांचे आरोप खोडून काढणारे पुरावेही या अहवालासोबत जोडण्यात आलेत.
याचं सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांकडे आहे, त्यामुळे नवनीत राणा यांचे आरोप कसे चुकीचे आहेत इतका पुरावा असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.