मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhv thackarey ) यांच्या मातोश्री निवासस्थानी ( Matoshri ) हनुमान चालीसा वाचन करण्याचे आव्हान देणाऱ्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा ( Navneet Rana ) आणि बडनेराचे आमदार रवी राणा ( Ravi Rana ) यांची आज न्यायालयाने जामिनावर सुटका केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवनीत राणा आणि रवी राणा यांनी मातोश्रीवर हनुमान चाळीस पठण करण्याचे आव्हान दिल्यानंतर शिवसैनिक आक्रमक झाले होते. शिवसैनिकांनी राणा दाम्पत्य यांनी मातोश्रीवर येऊन दाखवावेच असा इशारा दिला होता. यावेळी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी राणा दाम्पत्य यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला. 


पोलिसांनी राणा दाम्पत्य यांना कोर्टासमोर हजर केले असता कोर्टाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला. सुमारे १२ दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर कोर्टाने आज त्यांना जमीन मंजूर केला. राणा दाम्पत्य यांना प्रत्येकी ५० हजार आणि तितक्याच रकमेचे दोन जमीनदार अशी अट कोर्टाने घातली आहे. तसेच, कोर्टाने राणा दाम्पत्य यांना मीडियासोबत बोलण्याची बंदी घालण्यात आली आहे.


सत्र न्यायालयाने राणा दाम्पत्याला जामीन मंजूर केल्यानंतर नवनीत राणा यांची  भायखळा तुरुंगातून सुटका करण्यात आली. तेथून त्यांना थेट जे. जे. रुग्णालयात नेण्यात आलं. नवनीत राणा यांना स्पॉन्डिलायसिस हा आजार झाला आहे. रात्री त्यांना पाठदुखीचा त्रास जाणवत होता. त्यामुळे प्रकृती अस्वस्थेमुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


दरम्यान, राणा दाम्पत्याने मुंबई उपनगरातील खार येथील फ्लॅटमध्ये अवैध बांधकाम केल्याचा ठपका मुंबई महापालिकेनं ठेवला आहे. महापालिकेचे अधिकारी यांनी राणा दाम्पत्याच्या घरी जाऊन आवश्यक ते मोजमाप घेतले. घरामध्ये करण्यात आलेले अवैध बांधकाम हटवण्यासाठी त्यांना मुदत देण्यात येईल. या मुदतीमध्ये हे बांधकाम हटविले नाही तर पालिकेकडून कारवाई करण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिलीय.