मुंबई : पालघर (Palghar) जिल्ह्यातून एक अत्यंत दुःखद घटना समोर आली आहे. गरबा (Garba) खेळणाऱ्या तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने (Heart attack) मृत्यू झाला आहे. मुलाच्या मृत्यूचा धक्का वडिलांना सहन न झाल्याने त्यांचाही मृत्यू झाला. पालघरमधील विरारमध्ये (Virar) गरब्यामध्ये (Garba) नाचताना एका 35 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विरार पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, शनिवार-रविवारच्या मध्यरात्री विरारमधील ग्लोबल सिटी कॉम्प्लेक्समध्ये गरबा कार्यक्रमात मनीष नरपाजी सोनिग्रा नाचत असताना खाली पडला. मनीषला त्यांच्या वडीलांनी रुग्णालयात नेण्यात नेले. यावेळी त्याला मृत घोषित करण्यात आले. मुलाच्या मृत्यूची बातमी ऐकताच वडीलही कोसळले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून या संदर्भात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.


दरम्यान, गुजरातमध्येही गरबा खेळताना 21 वर्षीय तरुणाचा हृदयविकाराचा झटक्याने मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीय. रविवारी गुजरातमधील आनंद जिल्ह्यात गरबा खेळत असताना एका 21 वर्षीय तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. तारापुरा, आनंद येथील शिवशक्ती सोसायटीतर्फे गरबा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वीरेंद्र सिंग रमेश भाई राजपूत असे मृताचे नाव आहे. 30 सप्टेंबर रोजी 21 वर्षीय वीरेंद्र गरबा खेळत होता. यादरम्यान मित्र त्याचा व्हिडिओ बनवत होते. त्यानंतर अचानक वीरेंद्र बेशुद्ध होऊन खाली पडला.


सोसायटीतील लोकांनी त्याला घाईघाईत रुग्णालयात नेले. मात्र वाटेतच वीरेंद्रचा मृत्यू झाला. तरुणाचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. व्हिडिओच्या सुरुवातीला वीरेंद्र खूपच अस्वस्थ दिसत होता. त्यानंतर गरबा खेळताना तो जमिनीवर पडतो. 21 वर्षीय वीरेंद्र राजपूतचे वडील मोरज गावातील प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक आहेत. वीरेंद्र हा दोन भावांमध्ये लहान होता. मुलाच्या आकस्मिक निधनाने कुटुंबात शोककळा पसरली आहे.