... म्हणून किरिट सोमय्या यांना गंभीरतेने घेऊ नका - नवाब मलिक यांचा पलटवार
भाजप नेते किरिट सोमय्या यांनी वाधवान प्रकरणी जो आरोप केला आहे, तो आरोप...
मुंबई : भाजप नेते किरिट सोमय्या यांनी वाधवान प्रकरणी जो आरोप केला आहे, तो बिनबुडाचा आरोप आहे. राज्य सरकार या प्रकरणी योग्य ती कारवाई करत आहे. तर चौकशी करायचीच असेल या प्रकरणाची तर केंद्राला देखील ती करता येईल, असं राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. तसेच किरिट सोमय्या यांनी या प्रकरणात बेजबाबदार आरोप केले आहेत. किरिट सोमय्या हे बेजबाबदार आरोप करण्यासाठी प्रसिद्ध असल्याचंही नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.
किरिट सोमय्या सतत असे बेजबाबदार आरोप करत असतात, यामुळे मागील लोकसभा निवडणुकीत पक्षाने त्यांना तिकिट देखील नाकारलं आहे, म्हणून किरिट सोमय्या काय बोलतात, त्याला एवढं गांभीर्याने घेण्याची गरज नसल्याचं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, वाधवान यांच्यासह २४ लोकांना क्वोरोंटाईन करण्यात आलं आहे आणि त्यांच्या ५ गाड्या देखील जप्त करण्यात आल्या आहेत. वाधवान यांना एका शाळेच्या खाली खोल्यांमध्ये क्वोरोंटाईन करून ठेवण्यात आले आहे. वाधवान क्वोरोंटाईन असल्यामुळे १४ दिवसानंतर त्यांची सीबीआयकडून प्रत्यक्षात चौकशी होणार असल्याचंही सांगण्यात येत आहे.
दरम्यान, डीएचएफएल घोटाळ्यातील आरोपी वाधवान व्हीआयपी ट्रिटमेंट दिल्याप्रकरणी राज्याचं राजकारण तापलं आहे. राज्याचे विशेष गृह सचिव अमिताभ गुप्ता यांना या प्रकरणी सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे. आरोपींना लॉकडाउन दरम्यान मुंबईहून महाबळेश्वरला प्रवास करू दिल्याप्रकरणी, अमिताभ गुप्ता यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे.
तर अमिताभ गुप्ता हे पवारांचे बोलविता धनी आहेत, तसेच पवार कुटंबीय आणि वाधवान यांचे कुटूंबीय - दिवान बिल्डर्सचे संबंध चांगले आहेत, या प्रकरणी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही किरिट सोमय्या यांनी झी २४ तासशी बोलताना केले आहेत.
या प्रकरणात अमिताभ गुप्ता यांना अटक करावी आणि चौकशी करावी, यानंतर या प्रकरणामागे नेमकं कोण आहे, हे समोर येईल, असं किरिट सोमय्या यांनी म्हटलं आहे. वाधवान कुटूंबियांच्या ५ गाड्या आणि २३ जणांना सध्या क्वोरोंटाईन करण्यात आलं आहे.