नवी दिल्ली/मुंबई :  महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या सरकारला सर्कस म्हणून संबोधणाऱ्या संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना राष्ट्रवादी काँग्रेसने सडेतोड उत्तर दिले आहे. रिंगमास्टरच्या हंटरने चालणाऱ्या सरकारचे मंत्री लोकशाही पद्धतीने चालणाऱ्या सरकारला सर्कस म्हणत आहेत. हे त्यांचे अनुभवाचे बोल आहेत, असा पलटवार राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केला आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी व्हर्च्युअल रॅलीद्वारे महाराष्ट्रातील भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधला तेव्हा ठाकरे सरकार आणि शिवसेनेवर हल्लाबोल केला होता.



महाराष्ट्रातलं सरकार हे तीन पक्षांचं सरकार आहे. हे सरकार पाहून असं वाटतं की सरकारच्या नावाने सर्कस सुरु आहे. केंद्र सरकार प्रत्येक बाबतीत मदत करत असले तरी विकासाचं व्हिजन जसं असायला हवं तसं महाराष्ट्र सरकारकडे नाही, अशी टीका राजनाथ सिंह यांनी केली होती.



राजनाथ सिंह यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली. जेव्हा महाराष्ट्रात निवडणूक लढवली गेली तेव्हा शिवसेनेनं भाजपबरोबर निवडणूक लढवली. पण शिवसेनेने सत्तेच्या हव्यासापोटी भाजपला धोका दिला, असं राजनाथ म्हणाले. भाजप धोका खाऊ शकतो, पण धोका देणार नाही, हेच भाजपचं चरित्र आहे असं राजनाथ सिंह म्हणाले.



राजनाथ यांच्या या टीकेला राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी उत्तर दिलं. महाराष्ट्रात लोकशाही पद्धतीने चाललेलं सरकार चांगलं काम करत आहे. कोविड १९ च्या बाबतीत आयसीएमआरने मुंबई मॉडेलची प्रशंसा केली आहे, असं मलिक म्हणाले. रिंगमास्टरच्या हंटरने चालणाऱ्या सरकारचे मंत्री लोकशाही पद्धतीने चालणाऱ्या सरकारला सर्कस म्हणत आहेत. हे त्यांचे अनुभवाचे बोल आहेत, असं उत्तर मलिक यांनी दिले आहे.