मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजित पवार हे आज शिवतिर्थावर शपथविधीसाठी उपस्थित राहणार आहेत. अजित पवारांनी केलेलं बंड आणि त्यांच्या गळात उपमुख्यमंत्री पदाची माळ पडणार या शक्यतेवर पत्रकारांनी त्यांना अनेक प्रश्न विचारले. आज फक्त मुख्यमंत्री आणि ६ मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. शिवसेना, काँग्रेसचे आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी दोघेजण शपथ घेतील. राष्ट्रवादीतर्फे जयंत पाटील आणि छगन भुजबळ हे कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतील अशी माहिती अजित पवार यांनी दिली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज तुम्ही शपथविधीला जाणार आहात का ? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. तेव्हा बहिण सुप्रियासोबत मी शिवतिर्थावर जाणार पण मी आज शपथ घेणार नसल्याची माहिती त्यांनी 'झी २४ तास'ला दिली. मी शिवतिर्थावर आमदार म्हणून जात आहे. मी बिलकूल नाराज नसल्याचेही ते म्हणाले.  आमच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ आणि महत्वाचे नेते मिटींग घेतील. बाकीचे मंत्रीपद वाटप कसे असेल ? मला अडीच वर्षे मुख्यमंत्री पद द्यायचे की नाही ? या सर्वाचे निर्णय होतील असे त्यांनी म्हटले. 



मी बंड केलेलं नाही, मी भूमिका घेतली. मी राष्ट्रवादीत होतो, राष्ट्रवादीतच आहे आणि राष्ट्रवादीतच राहणार असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले. 
माझ्या पार्टीचे अध्यक्ष शरद पवार सांगतील तेच आपण करणार असल्याची माहिती अजित पवार यांनी 'झी २४ तास'ला दिली. 


उद्धव ठाकरेंच्या शपथविधीच्या तोंडावर नॉट रिचेबल झालेले अजित पवार संपर्कात आले आहेत. सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्यात फोनवरुन चर्चा झाली आहे. अजित पवार संध्याकाळी साडेपाच वाजता सिल्व्हर ओकवर येणार आहेत. तिकडून सुप्रिया सुळे आणि अजित पवार एकत्र शपथविधी सोहळ्यासाठी जाणार आहेत.


अजित पवारांना उपमुख्यमंत्री करण्यात यावं, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमधून दबाव वाढत आहे. त्यामुळे अजित पवारच उपमुख्यमंत्री होतील, पण याबाबतचा निर्णय आज दुपारी २ वाजता किंवा नंतर घेतला जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.


उपमुख्यमंत्रीपद अजित पवारांना द्यावे, अशी त्यांच्या समर्थकांची मागणी आहे. अजित पवारांना पाठिंबा देण्यासाठी त्यांचे अनेक समर्थक त्यांच्या घरी आणि धनंजय मुंडे यांच्या घरी जमले आहेत. अजित पवार धनंजय मुंडे यांच्या घरी येणार असल्याची चर्चा असल्याने तिथेही समर्थकांची गर्दी केली होती.


राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड झाल्यानंतर अजित पवारांनी भाजपला पाठिंबा देऊन खळबळ माजवून दिली. अजित पवारांनी पाठिंबा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पण अजित पवारांचं हे बंड ३ दिवसांमध्येच थंड झालं आणि अखेर त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. अजित पवारांनी पाठिंबा काढून घेतल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनाही मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला.